पॅरिस मास्टर्स स्पर्धेत व्हेरेव्ह विजेता
वृत्तसंस्था/ पॅरिस
एटीपी टूरवरील येथे झालेल्या 1000 दर्जाच्या पॅरिस मास्टर्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेव्हने फ्रान्सच्या युगो हंबर्टचा पराभव करत जेतेपद पटकाविले. आता एटीपीच्या मानांकन यादीत व्हेरेव्ह दुसऱ्या स्थानावर राहिल.
27 वर्षीय व्हेरेव्हने या अंतिम सामन्यात हंबर्टचे आव्हान 6-2, 6-2 असे सहज संपुष्टात आणले. व्हेरेव्हने आतापर्यंत एटीपी टूरवरील 1000 दर्जाच्या 7 स्पर्धा जिंकल्या आहेत. या वर्षीच्या टेनिस हंगामात झालेल्या प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम सामन्यात स्पेनच्या अल्कारेझने व्हेरेव्हचा पराभव केला होता. व्हेरेव्हने रोम आणि माद्रीद तसेच माँट्रीयल आणि सिनसिनॅटी स्पर्धा जिंकल्या आहेत. 2020 साली झालेल्या पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत रशियाच्या मेदव्हेदेवने व्हेरेव्हचा पराभव करत अजिंक्यपद मिळविले होते.
या स्पर्धेत शनिवारी व्हेरेव्हने उपांत्य फेरीचा सामना जिंकून एटीपीच्या ताज्या मानांकनात दुसऱ्या स्थानावर झेप घेताना स्पेनच्या अल्कारेझला मागे टाकले. आता ट्युरिनमध्ये 10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत व्हेरेव्ह सहभागी होत आहे. या वर्षीच्या टेनिस हंगामात व्हेरेव्हने इतर टेनिसपटूंच्या तुलनेत सर्वाधिक सामने जिंकले आहेत. त्याने एकूण या हंगामात 66 सामने जिंकले आहेत. आता एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत इटलीचा जेनिक सिनेर पहिल्या स्थानावर आहे. या टेनिस हंगामातील व्हेरेव्हचे एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद आहे. गेल्या मे महिन्यात त्याने रोममध्ये झालेल्या क्लेकोर्टवरील मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकली होती.