For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तृणमूल काँग्रेसमध्ये पडली उभी फूट

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
तृणमूल काँग्रेसमध्ये पडली उभी फूट
Advertisement

80 नवनिर्वाचित आमदारांपैकी 59 जणांचे बंड : विरोधी पक्षनेतेपदी बंडखोर नेत्याची नियुक्ती

Advertisement

ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व धोक्यात

  • बंडखोर गटाला ममता बॅनर्जी यांनी मान्यता द्यावी, अशी बंडखोरांची मागणी
  • ममता बॅनर्जी यांनी बंडखोर गटाच्या सल्लागार व्हावे, ही बंडखोरांची भावना
  • ममता बॅनर्जी कोणता निर्णय घेणार, यावर आता पक्षाचे भवितव्य अवलंबून

वृत्तसंस्था/कोलकाता

Advertisement

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल या राज्यात दारुण पराभवाला तोंड द्यावे लागलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये आता उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे. या पक्षाच्या 80 नवनिर्वाचित आमदारांपैकी 59 जणांनी बंड केले आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी दोन आमदारांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या निमित्ताने पक्षातून निलंबित केले होते. त्यांच्यापैकी रितब्रत बॅनर्जी यांना बंडखोरांनी आपला नेता मानले आहे.

बुधवारी विधानसभेत या फुटीचे प्रत्यक्ष दर्शन घडले. विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांना बंडखोर गटाने पत्र दिले असून आपलाच गट खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असल्याचे प्रतिपादन या पत्रात करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. सध्याच्या तृणमूल काँग्रेस पक्षात पक्षांतर्गत लोकशाही नाही. निर्णय प्रक्रिया संशयास्पद असून मोजक्या नेत्यांचे पक्षावर नियंत्रण आहे. सर्वसामान्य आमदारांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात किंमत नाही. त्यामुळे बंडखोर गट हाच खरा तृणमूल काँग्रेस पक्ष आहे, अशी मांडणी या पत्रात केली आहे, अशी माहिती आहे.

59 आमदारांचा पाठिंबा

विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाला 80 जागा मिळाल्या होत्या. या 80 आमदारांपैकी 59 आमदारांनी बंडखोर गटात प्रवेश केला असून रितब्रत बॅनर्जी यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पाठिंबा दिला आहे. या गटाने नवा पक्ष स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली अद्याप केलेल्या दिसत नाहीत. तथापि, त्याची वाटचाल त्याच दिशेने होत आहे, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.

ममता बॅनर्जी सल्लागार नेत्या

बंडखोर गटाचा विरोध ममता बॅनर्जी यांना नसून त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि त्याच्या गटातील आमदार यांना आहे, असे बंडखोर गटाचे म्हणणे आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या कंपूतील नेत्यांसह पक्ष हायजॅक केला आहे. हाच कंपू पक्षासंदर्भात सर्व निर्णय घेत आहे. त्यामुळे आमचा विरोध ममता बॅनर्जी यांना नसून या कंपूला आहे, असेही विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात बंडखोर गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे, अशीही माहिती सूत्रांकडून दिली गेली आहे.

ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान

बंडखोर गटाने ममता बॅनर्जी यांनाच नेता मानले असले, तरी दुसऱ्या बाजूला त्यांच्यासमोर आव्हानही उभे केले आहे. ममता बॅनर्जी यांनी आता सल्लागाराची भूमिका स्वीकारावी, असे विधान रितब्रत बॅनर्जी यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता बनल्यानंतर केले. यामुळे ममता बॅनर्जी यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. त्यांना बाजूला करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून पक्षात नेतृत्वपरिवर्तन केले जात आहे. ते शक्य न झाल्यास आपलाच तृणमूल काँग्रेस पक्ष खरा असे प्रतिपादन बंडखोर गटाकडून केले जाणे शक्य आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोर केवळ पक्ष टिकविणे हे आव्हान नसून आपले स्वत:चे नेतृत्व टिकविणे हे देखील आव्हान असल्याचे जाणकारांचे मत आहे.

‘महाराष्ट्रा’प्रमाणेच राजकीय घडामोडी

ममता बॅनर्जी यांनी आपल्या गटाला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता द्यावी. तसेच बंडखोर गटाच्या सल्लागार म्हणून मार्गदर्शन करावे, असे आवाहन रितब्रत बॅनर्जी यांनी केले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेता या नात्याने मी तृणमूल काँग्रेसला सोसावी लागलेली हानी भरुन काढणार आहे. काही नेत्यांमुळे ही हानी झाली आहे. विरोधी पक्षनेता म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी अविरत कार्यरत राहणार आहे, असे आश्वासनही रितब्रत बॅनर्जी यांनी दिले. आता ममता बॅनर्जींची भूमिका काय असणार, हे महत्वाचे ठरेल. अन्यथा, महाराष्ट्रात 2022 मध्ये जे घडले, तेच पश्चिम बंगालमध्ये घडण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.