व्हर्स्टेपन जपान ग्रा प्री विजेता
वृत्तसंस्था / सुझुका (जपान)
रविवारी येथे झालेल्या 2025 च्या एफ-1 ग्रा प्री मोटर रेसिंग हंगामातील जपान ग्रा प्री मोटार शर्यतीचे अजिंक्यपद रेड बुल चालक मॅक्स व्हर्स्टेपनने पटकाविले. चालू वर्षीच्या रेसिंग हंगामातील व्हर्स्टेपनचे हे पहिले विजेतेपद आहे.
हॉलंडच्या मॅक्स व्हर्स्टेपनने सुझुका सर्किटमधील ही मोटार शर्यत सलग चौथ्यांदा जिंकली आहे. चालू वर्षीच्या रेसिंग हंगामातील ऑस्ट्रेलियाच्या मेलबॉर्नमधील पहिली ग्रा प्री शर्यत मॅक्लेरेनच्या लॅन्डो नोरिसने तर दुसरी चीनमधील शांघाय येथे झालेली ग्रा प्री शर्यत ऑस्कर पिसेट्रीने जिंकली होती.
रविवारी झालेल्या जपान ग्रा प्री शर्यतीमध्ये व्हर्स्टेपनने शनिवारच्या सराव सत्रामध्ये पोल पोझिशन विक्रमी जलद वेळ नोंदवित पटकाविले होते. जपान ग्रा प्री शर्यतीमध्ये सुरुवातीला व्हर्सेपन आणि नोरीस यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली होती. त्यानंतर पीसेट्रीने शेवटच्या दोन टप्प्यात बऱ्यापैकी आघाडी घेतली होती. दरम्यान व्हर्स्टेपनने या दोन प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. नोरिसने दुसरे स्थान तर पीसेट्रीने तिसरे, फेरारी चालक लेकरेक चौथ्या स्थानावर राहिला. मर्सिडीज चालक जॉर्ज रसेलला पाचव्या स्थानावर तर त्याचा सहकारी किमी अँटोनेलीला सहावे स्थान मिळाले. व्हर्स्टेपनने नोरिसला शेवटच्या टप्प्यात 10 सेकंदाने मागे टाकत विजेतेपद हस्तगत केले.