For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रमदानातून वेर्ले येथे बंधारा; ग्रामस्थांच्या एकजुटीतून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संकल्प

12:14 PM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्रमदानातून वेर्ले येथे बंधारा  ग्रामस्थांच्या एकजुटीतून ‘पाणी अडवा  पाणी जिरवा’चा संकल्प
Advertisement

सावंतवाडी : वेर्ले येथील फौजदारवाडी, मर्गजवाडी आणि लिगवतवाडी या तीनही वाड्यांतील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून नदीपात्रातील गाळ काढून बंधारा उभारला. ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमातून ‘गाव करील ते राव करील काय’ ही म्हण प्रत्यक्षात उतरली आहे.

Advertisement

उन्हाळ्यात पाण्याची पातळी टिकून राहावी, शेती तसेच जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता व्हावी आणि भूजल पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी हा उपक्रम हाती घेतला. नदीपात्रात साचलेला गाळ काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासोबतच पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला.

ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे यांच्या संकल्पनेतून या श्रमदान उपक्रमाला सुरुवात झाली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तिन्ही वाड्यांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश कृतीतून साकारत गावकऱ्यांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले.

Advertisement

या श्रमदानात ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे, ममता राऊळ, चंद्रकला गोसावी यांच्यासह ग्रामस्थ, तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, तरुण मंडळांचे आणि श्रमदान करणाऱ्या नागरिकांचे आभार मानण्यात आले. “एकजूट हेच बळ; गावाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे,” असे बाळू गावडे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :

.