For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हेरेव्ह, पुतिनसेव्हा चौथ्या फेरीत

06:17 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्हेरेव्ह  पुतिनसेव्हा चौथ्या फेरीत
Advertisement

स्वायटेक पराभूत, बोपण्णा-एब्डन यांचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

2024 च्या विम्बल्डन ग्रासकोर्ट ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीमध्ये पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकचे आव्हान तिसऱ्या फेरीत रशियाच्या युलिया पुतिनसेव्हाने संपुष्टात आणले. पुरुष विभागात जर्मनीचा अॅलेक्सझांडेर व्हेरेव्ह, बेन शेल्टन तसेच महिला विभागात पुतिनसेव्हा यांनी चौथ्या फेरीत स्थान मिळविले. पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्यांचा ऑस्ट्रेलियन साथिदार मॅथ्यू एब्डन यांना दुसऱ्या फेरीतच हार पत्करावी लागली.

Advertisement

पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हने ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीचे आव्हान 6-4, 6-4, 7-6 (15-13) असे संपुष्टात आणले. नुरीच्या पराभवामुळे या स्पर्धेतील ब्रिटनचे आव्हान संपुष्टात आले आहे. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या बेन शेल्टनने कॅनडाच्या डेनिस शेपोव्हॅलोव्हचा 6-7 (4-7), 6-2, 6-2, 4-6, 6-2 अशा 5 सेट्समधील लढतीत पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. विम्बल्डनच्या इतिहासामध्ये 2018 नंतर 5 सेट्समधील लढतीत सलग 3 सामने जिंकणारा शेल्टन हा पहिला टेनिसपटू आहे. 2018 साली गुलबीसने हा पराक्रम केला होता. 16 व्या मानांकित  हंबर्टने चौथ्या फेरीत स्थान मिळविताना ब्रेंडॉन नाकाशिमाचा 7-6 (9-7), 6-3, 6-7 (5-7), 7-6 (8-6) असा पराभव केला. आता हंबर्ट आणि या स्पर्धेतील विद्यमान विजेता स्पेनचा कार्लोस अल्कारेझ यांच्यात चौथ्या फेरीतील सामना होणार आहे.

महिलांच्या विभागात तिसऱ्या फेरीतील सामन्यात रशियाच्या युलिया पुतिनसेव्हाने पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकला 3-6, 6-1, 6-2 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का देत चौथी फेरी गाठली. टॉप सिडेड स्वायटेकने आतापर्यंत 5 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली असून त्यामध्ये चार वेळेला फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. मात्र 23 वर्षीय स्वायटेकला यावेळी तिसऱ्या फेरीतच हार पत्करावी लागली आहे. महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात चीनच्या वेंगने ब्रिटनच्या हॅरेट डर्टचा 2-6, 7-5, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. तसेच एलेना ओस्टापेंकोने पेराचा 6-1, 6-3 असा फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळविले.

पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात जर्मनीच्या बिगर मानांकित जिबेन्स आणि फ्रांझेन यांनी रोहन बोपण्णा व एब्डन यांचा 6-3, 7-6 (7-4) अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. हा सामना 70 मिनिटे चालला होता.

Advertisement
Tags :

.