लुथरा बंधूंच्या जामीनअर्जावर आज निकालाची शक्यता
पणजी : म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी कथित दस्तावेज बनावट प्रकरणात सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या जामीनअर्जावरील निकाल राखून ठेवला आहे. आज सदर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्यातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईटक्लबचे दिल्लीस्थित मालक असलेले गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना सदर क्लबच्या अग्निकांड प्रकरणातील 25 मृत्युपायी दोषी मानले जात असले तरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने अनेक अटीं - शर्तीसह जामीन मंजूर केला होता. दोन्ही लुथरा बंधूंवर कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची बनावट ‘एनओसी’ वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, सदर गुन्हा खुनासारख्या अत्यंत घृणास्पद गुह्यांच्या श्रेणीत येत नाहीत, ज्यात अधिकतम शिक्षा मृत्युदंड किंवा अनिवार्य जन्मठेपेपर्यंत असू शकते.
शिवाय, खुनाच्या बरोबरीचा नसलेला सदोष मनुष्यवध हा मृत्यू घडवून आणण्याच्या हेतूशी संबंधित गुह्यांपेक्षा तुलनेने कमी गंभीर स्वरूपाचा आहे. न्यायालयाने आपल्या निष्कर्षात नमूद केले आहे की, अर्जदारांना सतत आणि दीर्घकाळ ताब्यात ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही ठोस किंवा सबळ कारणे सादर करण्यात अभियोजन पक्ष अपयशी ठरला आहे. तसेच अर्जदारांच्या जलद सुनावणीच्या हक्काचे संरक्षण कसे केले जाईल, याबाबत अभियोजन पक्षाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर आले नाही. विशेषत: जेव्हा आरोपपत्र आधीच दाखल झाले आहे आणि सुनावणी अद्याप सुरू व्हायची आहे. जलद कार्यवाहीचे कोणतेही आश्वासन नसल्यामुळे, सततचा तुऊंगवास अन्यायकारक ठरेल. न्यायालयाने हेही नमूद केले की, आणखी एक सहआरोपी, दिग्दर्शक अजय गुप्ता, यांची आधीच जामिनावर सुटका झाली आहे; त्यामुळे, समानतेच्या आधारावर लुथरा बंधूंनाही जामीन मिळायला हवा.
लुथरा बंधूंवरील गुन्हा गंभीर नाही : न्यायालय
बनावट ‘एनओसी’ वापरल्याच्या आरोप प्रकरणात, म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी गौरव आणि सौरभ लुथरा यांना जामीन मंजूर करताना असे निरीक्षण नोंदवले की, हा अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुह्याचा आरोप नाही. लुथरा बंधूंवरील आरोपांमध्ये, अगदी टोकाच्या पातळीवरही, मृत्यू घडवून आणण्याच्या कोणत्याही हेतूचा उल्लेख नाही. बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार कमाल शिक्षा दहा वर्षे किंवा जन्मठेपेची आहे; तथापि, किमान शिक्षा अनिवार्य असल्याचे नोंद नाही.