ऑस्ट्रेलियन स्पर्धेत व्हीनसचे पाच वर्षांनंतर पुनरागमन
वृत्तसंस्था / मेलबर्न
अमेरिकेची माजी अव्वल महिला टेनिसपटू तसेच सात ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी 45 वर्षीय व्हीनस विलियम्सला 2026 च्या टेनिस हंगामातील येथे 18 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश स्पर्धा आयोजकांनी दिला आहे.
व्हीनस विलियम्सचे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तब्बल पाच वर्षांनंतर यावेळी पुनरागमन होत आहे. या स्पर्धेत तिने आपले पदार्पण 1998 साली केले होते आणि तिने आपली लहान बहीण सेरेनाचा दुसऱ्या फेरीत पराभव केला होता. पण व्हीनसला उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या लिंडसे डेव्हनपोर्टने पराभूत केले होते. गेल्या नोव्हेंबरमध्ये व्हीनस विलियम्सने ऑकलंड स्पर्धेत खेळण्याची घोषणा केली होती. ऑकलंड स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला आता दोन आठवडे बाकी राहिले असून तिला स्पर्धा आयोजकांनी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी ती होबार्टमधील स्पर्धेत सरावासाठी सहभागी होत आहे. 2021 साली व्हीनसने या स्पर्धेत आपला शेवटचा सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेच्या इतिहासात तिने दोनवेळा महिला एकेरीचे उपविजेतेपद मिळविले होते. 2003 आणि 2017 साली या स्पर्धेत सेरेनाने व्हीनसचा अंतिम सामन्यात पराभव करुन विजेतेपद पटकाविले होते. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये व्हीनसने 54 सामने जिंकले असून 21 सामने गमविले आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात सहभागी होणारी व्हीनस ही सर्वात वयस्कर महिला टेनिसपटू असून तिने जपानच्या किमीको डेटचा विक्रम मागे टाकला आहे. डेटने आपल्या वयाच्या 44 व्या वर्षी या स्पर्धेत सहभाग दर्शविला होत.