कालेली नदीपात्रात बुडून वेंगुर्ल्यातील तरुणाचा मृत्यू, अंघोळीदरम्यान पाय घसरून पाण्यात पडला; चुलतभाऊ आणि मित्राच्या डोळ्यादेखत घडली दुर्घटना
प्रतिराज कुडपकर हा आपला चुलतभाऊ संतोष कुडपकर आणि एका मित्रासह शनिवारी वेंगुर्लेहून माणगाव येथे गेला होता. परिसरात मित्राच्या नातेवाईकांचे घर असल्याने त्यांनी तेथे भेट दिली. त्यानंतर तिघेही कालेली-धरणवाडी येथील निर्मला नदीपात्रातील देवकोंड परिसरात अंघोळीसाठी गेले.
यावेळी प्रतिराज नदीपात्रात अंघोळ करत असताना अचानक त्याचा पाय दगडावरून घसरला. तोल जाऊन तो दगडावर आदळल्यानंतर पाण्यात पडला आणि चिखलात अडकला. त्याचे चुलतभाऊ आणि मित्र नदीपात्राबाहेर असल्याने त्यांनी तातडीने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला आणि प्रतिराजचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र भिसे आणि पोलिस नाईक नितीन शेडगे घटनास्थळी दाखल झाले. कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. माणगाव-कट्टा गावचे पोलिस पाटील अभिषेक काणेकर, माणगाव-नमसगावचे पोलिस पाटील सोनू कानडे आणि स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली.
मृतदेह कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी प्रतिराज यांचे चुलतभाऊ संतोष सुदर्शन कुडपकर यांनी माणगाव पोलिस दूरक्षेत्रात फिर्याद दिली.
प्रतिराज हा स्लायडिंगचा व्यवसाय करत होता. मित्रपरिवारात तो ‘राजू’ या नावाने परिचित होता. त्याच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, भाऊ, भावजय, काका, चुलत भाऊ-बहिणी असा परिवार आहे. त्याच्या अकाली निधनाने कुडपकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून वेंगुर्ले परिसरात शोककळा पसरली आहे.