For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2027 विश्वचषकातील सामन्यांची केंद्रे जाहीर

06:25 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
2027 विश्वचषकातील सामन्यांची केंद्रे जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था, जोहान्सबर्ग, द. आफ्रिक़ा

Advertisement

2027 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची ब्रँड ओळख आणि सामन्यांची ठिकाणे गुरुवारी येथे जाहीर करण्यात आली, त्यावेळी ‘क्रिकेट साऊथ आफ्रिका‘चे सीईओ फोलेत्सी मोसेकी आशा आणि उत्साहाने भारावून गेले होते.

जोहान्सबर्गमधील एका भव्य समारंभात आगामी विश्वचषकाचे यजमानपद भूषवणाऱ्या 12 केंद्रांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील आठ शहरे, झिम्बाब्वेमधील तीन शहरे आणि नामिबियाची राजधानी विंडहोक यांचा समावेश आहे. 50 षटकांची ही प्रतिष्ठित स्पर्धा 24 वर्षांनंतर आफ्रिकेत परतत आहे; दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे देश 2027 च्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे संयुक्त यजमान असतील. यापूर्वी 2003 मध्ये या खंडाने स्पर्धेची आठवी आवृत्ती आयोजित केली होती, तेव्हा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया हे सह-यजमान होते.

Advertisement

आफ्रिकेत आठ ठिकाणी सामने होणार

विश्वचषकाच्या या 14 व्या आवृत्तीत जगातील अव्वल 14 संघ सहभागी होतील. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका आठ ठिकाणी सामन्यांचे आयोजन करेल. यामध्ये जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियम, सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क, केपटाउनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, डर्बनमधील किंग्समीड क्रिकेट ग्राउंड, गेबेर्हामधील सेंट जॉर्ज पार्क, ब्लूमफॉन्टेनमधील मंगांग ओव्हल, पार्लमधील बोलँड पार्क आणि कुगोम्पो सिटी (पूर्वीचे ईस्ट लंडन) येथील बफेलो पार्क यांचा समावेश आहे. झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब (हरारे), क्वीन्स स्पोर्ट्स क्लब (बुलावायो) आणि फले मोसी-ओआ-तुन्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम (व्हिक्टोरिया फॉल्स) येथे सामन्यांचे आयोजन करेल, तर नामिबियाची राजधानी विंडहोक येथील नामिबिया क्रिकेट ग्राउंडवर सामने खेळवले जातील.

एकूण 57 सामने

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2027 मध्ये एकूण 57 सामने खेळवले जातील. यात तीन टप्प्यांचे एक नवीन स्वरूप सादर केले जाईल, ज्याचा उद्देश स्पर्धात्मकता वाढवणे, सामन्यांना अधिक महत्त्व प्राप्त करून देणे आणि चाहत्यांना स्पर्धेचा अधिक रोमांचक अनुभव देणे हा आहे. या स्पर्धेची सुरुवात ‘सुपर सिरीज‘ने होईल, ज्यामध्ये सर्वात कमी मानांकन असलेले तीन संघ (12 ते 14 व्या क्रमांकाचे) ‘राउंड-रॉबिन‘ पद्धतीने एकमेकांशी खेळतील आणि त्यातील विजेता संघ पुढील फेरीत प्रवेश करेल. त्यानंतरच्या फेरीत 12 संघ असतील, ज्यांची प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांत विभागणी केली जाईल आणि प्रत्येक संघ आपापल्या गटात ‘राउंड-रॉबिन‘ पद्धतीने सामने खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ आणि दोन्ही गटांतील चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांपैकी सर्वोत्तम संघ, असे एकूण सात संघ ‘सुपर 7’ फेरीसाठी पात्र ठरतील. ‘सुपर 7’ फेरीत 21 ‘राउंड-रॉबिन‘ सामने खेळवले जातील आणि त्यातून अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामन्यातील स्थानासाठी, गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ चौथ्या क्रमांकावरील संघाशी, तर दुसऱ्या क्रमांकावरील संघ तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी भिडेल.

Advertisement
Tags :

.