For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खऱ्या माणसांच्या गोष्टी खऱ्या पद्धतीने सांगणारे लेखक व्यंकटेश माडगूळकर!

12:37 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
खऱ्या माणसांच्या गोष्टी खऱ्या पद्धतीने सांगणारे लेखक व्यंकटेश माडगूळकर
Advertisement

मंजिरी देवरस यांचे मत : मंथनतर्फे ‘मराठी मातीतला गोष्टीवेल्हाळ लेखक’ कार्यक्रम

Advertisement

बेळगाव : खऱ्या माणसांच्या गोष्टी खऱ्या पद्धतीने आणि सहजसोप्या भाषेत सांगणारे लेखक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर होत. जगात एक सांगणारा व एक ऐकणारा आहेत तोपर्यंत गोष्ट राहणारच, असा आशावाद देणारे माडगूळकर हे मराठी साहित्यातील बहुआयामी लेखक. यंदाचे वर्ष हे त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष. या निमित्ताने मंथनतर्फे ‘मराठी मातीतला गोष्टीवेल्हाळ लेखक’ हा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी वरेरकर नाट्या संघामध्ये झाला. यावेळी मंजिरी देवरस यांनी माडगूळकरांच्या साहित्याचे, कथांचे वाचन केले. त्या म्हणाल्या, पिंडाने पंडित, हाताने कलावंत व वृत्तीने संत असे माडगूळकरांचे व्यक्तिमत्त्व होते.  भाकरीचा तुकडा कावळ्याने पळवल्यावर त्याच्या मागे 4 कि. मी. धावत जाऊन तो पुन्हा मिळविण्याची पराकाष्ठा त्यांनी केली.

ते उत्तम शिकारी होते. मात्र मारुती चित्तमपल्ली यांच्याशी स्नेह झाल्यावर त्यांना रानाबद्दल कुतूहल निर्माण झाले व पशु-पक्षी त्यांना वाचता येऊ लागले. बारा बलुतेदारांमुळे त्यांच्या साहित्यावर अस्सल ग्रामीण बोलीचा प्रभाव आहे. त्यांच्याकडे पदवी नव्हती, पण इंग्रजीची उत्तम जाण होती. स्वत:च्या लेखकपणाचा त्यांना अभिमान होता. त्यामुळे आणीबाणीमध्ये तुम्ही जे लिहाल, वाचाल ते दाखवा, असा फतवा आल्यावर वाघाला वाघनखे वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे त्यांनी सुनावले होते. आपली आई उत्तम रांगोळी रेखाटत असे. त्यामुळे रंगरेषा शिल्पाकृतींचे आकलन तिच्यामुळेच सुरू झाले, असे ते मानत, असे सांगून आईवरील लेख मंजिरी यांनी वाचून दाखवला.

Advertisement

आपला पती मामलेदारासाठी पाणी घेऊन जातो हे सहन न झाल्याने मामलेदाराच्या बायकोच्या थोबाडीत मारण्याची धमक आईने दाखवली होती, असे त्यांनी सांगताच या धैर्याबद्दल रसिकांनीही दाद दिली. याशिवाय अक्षर हे स्वत:चे घर उभारताना आलेल्या अडचणींवर कशी मात केली, या लेखाचे वाचनही मंजिरी यांनी केले. बदलत्या ग्रामीण चित्रांचे स्पंदन साहित्यात आणणाऱ्या, स्वातंत्र्योत्तर काळात नवकथेची जडणघडण करण्यात माडगूळकरांचा मोलाचा सहभाग होता. त्यांची अरण्यचिंतने विश्वचिंतनाकडे नेणारी आहेत, असे स्पष्ट करून पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लीट. ही पदवी दिली. त्या मानपत्राचे वाचनही मंजिरी यांनी केले. प्रारंभी मंथनच्या अध्यक्षा अपर्णा देशपांडे यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय,  सूत्रसंचालन व आभार मौसमी भातकांडे यांनी मानले.

Advertisement
Tags :

.