वेंगुर्ला पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत
दाबोली-मोबारवाडी येथील रहिवासी सलोनी सुधीर लोलयेकर (वय ७२) यांच्या राहत्या घरातून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या दागिन्यांचे एकूण वजन ५१५ ग्रॅम असून, त्यांची अंदाजित किंमत २० लाख रुपये आहे. याप्रकरणी लोलयेकर यांनी २३ सप्टेंबर २०२६ रोजी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अंतर्गत गुन्हा नोंदवला.
पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. दरम्यान, लोलयेकर यांच्या घरी घरकाम करणाऱ्या मार्टिना डुमिन लुद्रिक (वय २७, रा. दाबोली-मोबारवाडी, ता. वेंगुर्ला) हिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान संशयित महिलेने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर चोरीस गेलेल्या दागिन्यांचा शोध घेतला असता, ते तिच्या राहत्या घराशेजारील पडक्या घरात ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी कारवाई करून सर्व दागिने जप्त केले.
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकात पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक योगेश कांबळे, पोलीस हवालदार योगेश सराफदार, प्रकाश कदम व आशिष गंगावणे, पोलीस नाईक स्वप्नील तांबे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज परुळेकर व जयेश सरमळकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल सिंधू मोंगल आणि होमगार्ड आरोसकर यांचा सहभाग होता.
