For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत 'स्वच्छता लीग' क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन

04:51 PM Apr 17, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत  स्वच्छता लीग  क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी ‘स्वच्छता लीग २०२६’ क्रीडा स्‍पर्धा तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि.१८ व १९ एप्रिल रोजी वेंगुर्ला येथील मेजर ध्यानचंद क्रीडांगण (कॅम्प) येथे करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि गौरवशाली नगरपरिषदांपैकी एक असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या स्थापनेच्या १५० व्या वर्षात म्हणजेच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. येत्या २५ मे २०२६ रोजी हा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत असून, वर्षानुवर्षे शहराच्या विकासासोबतच ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत नगरपरिषदेने सातत्याने प्रगतीची वाटचाल केली आहे.या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वाजता सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग नगरविकास शाखेचे जिल्हा सह आयुक्त विनायक औधकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होईल, त्यानंतर सहभागी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींच्या पथकांचे संचलन होणार आहे.या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध नगरसंस्थांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. एकूण ४५० हून अधिक खेळाडूंनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे , यामध्ये क्रिकेट (महिला व पुरुष), बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, गोळाफेक, १०० मीटर धावणे यांसारख्या खेळांसोबतच महिलांसाठी विशेष रस्सीखेच आणि पुरुषांसाठी पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून प्रशासकीय कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून क्रीडा स्पर्धांच्या जोरावर आपापसातील स्नेह वृद्धिंगत करणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.वेंगुर्ला नगरपरिषदेने नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षातील हे क्रीडा स्‍पर्धांचे आयोजन देखील जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात एक नवा अध्याय जोडणारे ठरेल. या सोहळ्याचा आणि खेळाडूंच्या कौशल्याचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी व क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्‍यक्ष दिलीप गिरप व मुख्‍याधिकारी हेमंत किरुळकर यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.