मोकाट जनावरांमुळे अपघात टाळण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद ॲक्शन मोडवर
वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघातांचा धोका वाढत असल्याने वेंगुर्ला नगरपरिषदेने याविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेंतर्गत शहरातील रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून नगरपरिषदेच्या माध्यमातून गोशाळेत हलविण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी आढळलेल्या जनावरांच्या मालकीबाबत पूर्वसूचना न देता त्यांना ताब्यात घेण्यात येईल, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.
रात्री अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह बेल्ट
रात्रीच्या वेळी रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गायी, वासरे आणि बैलांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नगरपरिषदेकडून जनावरांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट (परावर्तित पट्टे) बांधण्यात येत आहेत.
वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश या पट्ट्यांवर पडल्यास अंधारातही जनावरे वाहनचालकांना स्पष्टपणे दिसणार आहेत. त्यामुळे अचानक समोर येणाऱ्या जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यास मदत होणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.
जनावरे मोकाट सोडू नयेत
जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेने केले आहे.
मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास संबंधित जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 तसेच वेंगुर्ला नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई (नियोजन) उपविधी 2015 मधील तरतुदींनुसार ही कारवाई केली जाणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.
वेंगुर्ला शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या या विशेष मोहिमेस सहकार्य करावे आणि आपल्या मालकीची जनावरे मोकाट सोडू नयेत, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.