मोकाट जनावरांमुळे धोका वाढला; वेंगुर्ला नगरपरिषदेकडून कठोर कारवाईचा इशारा
वेंगुर्ले (वार्ताहर) : वेंगुर्ला शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट जनावरांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच रात्रीच्या वेळी मोकाट जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदेने मोकाट जनावरांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेंतर्गत शहरातील रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून नगरपरिषदेच्या माध्यमातून गोशाळेत हलविण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी आढळलेल्या जनावरांच्या मालकीबाबत पूर्वसूचना न देता त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.
रात्री अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह बेल्ट
रात्रीच्या वेळी मोकाट गायी, वासरे आणि बैल वाहनचालकांना स्पष्ट दिसावेत, यासाठी नगरपरिषदेकडून जनावरांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट (परावर्तित पट्टे) लावण्यात येत आहेत. वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश या पट्ट्यांवर पडल्यास अंधारातही जनावरे दूरून दिसण्यास मदत होणार असून, त्यामुळे संभाव्य अपघात टाळता येणार आहेत.
नगरपरिषदेने जनावरांच्या मालकांना आपली जनावरे मोकाट न सोडता सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मालकांवरही होणार कारवाई
मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास संबंधित जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 तसेच वेंगुर्ला नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई (नियोजन) उपविधी 2015 मधील तरतुदींचा आधार घेतला जाणार आहे.
वेंगुर्ला शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या या विशेष मोहिमेला सहकार्य करावे आणि आपल्या मालकीची जनावरे मोकाट सोडू नयेत, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.