For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हेनेझुएला अध्यक्ष आजपासून भारत दौऱ्यावर

06:06 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्हेनेझुएला अध्यक्ष आजपासून भारत दौऱ्यावर
Advertisement

विदेश मंत्रालयाने दिली माहिती : 4 दिवसीय असणार दौरा : ऊर्जा सहकार्य वृद्धींगत होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

व्हेनेझुएलाच्या काळजीवाहू अध्यक्ष डेल्सी रोड्रिगेज बुधवारपासून 4 दिवसीय भारत दौऱ्यावर असणार आहेत. यापूर्वी त्या 1 जून रोजी आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स परिषदेकरता भारतात येणार होत्या, परंतु ही परिषद इबोला महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. रोड्रिगेज यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत व्हेनेझुएलाचे अनेक मंत्रीही सामील असतील.

Advertisement

व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष रोड्रिगेज या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, औषध, आरोग्य, परिवहन आणि नूतनीकरणीय ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्यावर चर्चा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भारत-व्हेनेझुएला संबंध आणखी मजबूत करण्यावरही चर्चा होणार असल्याची माहिती भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी दिली आहे.

नेपाळ-भारत सीमा वाद

भारत-नेपाळ सीमेचा जवळपास 98 टक्के हिस्सा यापूर्वीच निश्चित झाला आहे. परंतु काही हिस्स्यांमध्ये अद्याप समस्या आहे. ही समस्या नदीचे मार्ग बदलणे आणि काही ठिकाणांवर सीमा वादामुळे असून ती दूर करण्यासाठी दोन्ही देश मिळून काम करत आहेत. हे पूर्णपणे भारत आणि नेपाळचे द्विपक्षीय प्रकरण आहे. यात कुठल्याही तिसऱ्या देशाची कोणतीच भूमिका असू शकत नाही असे विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. नेपाळमधील सत्तारुढ पक्ष आरएसपीचे अध्यक्ष रवि लामिछाने हे भारत दौऱ्यावर असून ते उच्चस्तरीय बैठकांमध्ये सामील होणार असल्याची माहिती विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.

पाकिस्तान, युरोपीय महासंघाला सुनावले

पाकिस्तान आणि युरोपीय महासंघाच्या संयुक्त वक्तव्यात जम्मू-काश्मीरवरून करण्यात आलेल्या टिप्पणीवर भारताने कठोर प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारचे वक्तव्य भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे. या मुद्द्यावर बोलण्याचा पाकिस्तान आणि युरोपीय महासंघाला कुठलाच अधिकार नाही, त्यांनी यावर टिप्पणी करू नये असे विदेश मंत्रालयाने सुनावले आहे.

बांगलादेशसोबत नदी वाद

भारत आणि बांगलादेश दरम्यान 54 नद्या वाहत आहेत. या नद्यांच्या जलवाटपाचा मुद्दा सोडविण्यासाठी एक संयुक्त नदी आयोग काम करत आहे. सर्व प्रकरणांना याच चौकटीच्या अंतर्गत चर्चेतून निकाली काढण्यात येत असल्याचे जायसवाल यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.