For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Venezuela Earthquake व्हेनेझुएलातील भूकंपात 235 जणांचा मृत्यू : 4,300 हून अधिक जखमी : 46,000 हून अधिक लोक बेपत्ता

09:54 PM Jun 26, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
venezuela earthquake व्हेनेझुएलातील भूकंपात 235 जणांचा मृत्यू   4 300 हून अधिक जखमी   46 000 हून अधिक लोक बेपत्ता
Advertisement

► वृत्तसंस्था
कराकस
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशात विनाशकारी भूकंपाने हाहाकार माजवला आहे. एका मिनिटाच्या अंतराने आलेल्या 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या दोन शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांमुळे आतापर्यंत किमान 235 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 4,300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेकडो लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथके आणि स्थानिक रहिवासी अथक प्रयत्न करत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बचाव पथके आणि मानवतावादी मदत आपत्तीग्रस्त भागात दाखल झाली आहे.

Advertisement

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशात झालेल्या दोन भूकंपांमध्ये प्रचंड हानी झाली आहे. या विनाशकारी भूकंपामुळे सुमारे 250 इमारतींचे नुकसान झाले किंवा त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. सध्या बचाव पथके ढिगारे हटवत आहेत आणि वाचलेल्यांचा शोध घेत आहेत, तर रुग्णालये आणि तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. बुधवार, 24 जून रोजी व्हेनेझुएलामध्ये 1821 च्या काराबोबो युद्धाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय सुट्टी असल्यामुळे बहुतेक लोक घरात बसून फिफा विश्वचषकाचे सामने पाहत होते. परिणामी, ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे.

कोसळलेल्या इमारतींखाली अनेक लोक अडकले असून त्यांचा बचाव व शोध घेण्याचे प्रयत्न गतिमान करण्यात आले आहेत. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ढिगाऱ्याखालून आवाज ऐकू येत आहेत. आवाजाच्या दिशेने संबंधितांचा शोध घेतला जात आहे. भूकंपानंतर बोका दे अरोआ शहराचा वीजपुरवठा खंडित झाला असून अनेक घरे कोसळली आहेत. हे शहर राजधानी कराकसच्या पश्चिमेला सुमारे 220 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.

Advertisement

भूकंपाच्या तीव्रतेचे खरे स्वरूप अद्याप समोर आलेले नाही. बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करणाऱ्या एका वेबसाइटनुसार 46,000 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मात्र, सरकारने गुरुवारी रात्री उशिरा 39,000 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. तथापि या आकड्याची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकली नाही. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपात 10,000 हून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. या आपत्तीमुळे व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेला 9.5 ट्रिलियन रुपयांचे नुकसान होऊ शकते. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉड्रिग्ज यांच्याशी संवाद साधला असून मदतीचा प्रस्ताव दिला आहे.
भारताकडून मदत साहित्य रवाना
भारताने भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी ‘ऑपरेशन अमिस्ताद’ सुरू केले आहे. भारतीय हवाई दलाची दोन सी-17 विमाने मदत घेऊन रवाना झाली आहेत. या मदत पथकात भारतीय लष्कराचे एक फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. या कठीण काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी उभा आहे आणि मदत व बचावकार्यात सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
अनेक देशांकडून मदतीचा ओघ

सरकार बाधित लोकांना मदत पुरवण्यासाठी आणि बचावकार्याला गती देण्यासाठी काम करत आहे. एल साल्वाडोर, चिली, इक्वेडोर आणि अमेरिकेसह अनेक देश भूकंपानंतरच्या परिस्थितीला हाताळण्यासाठी व्हेनेझुएलामध्ये बचाव पथके पाठवत आहेत. तुर्कीची आपत्ती व्यवस्थापन संस्था, ‘एएफएडी’ने भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या नागरिकांना मदत करण्यासाठी दोन लष्करी विमाने पाठवणार असल्याचे म्हटले आहे. पहिल्या ए-400एम विमानातून 38 सदस्यांचे शोध आणि बचाव पथक, मानवतावादी मदत कार्यकर्ते, पाच सदस्यांचे वैद्यकीय बचाव पथक, तुर्की रेड क्रेसेंटचे दोन सदस्य, दोन स्निफर श्वान आणि तीन पूर्णपणे सुसज्ज बचाव वाहने पाठविण्यात आली. दुसऱ्या ए-400एम विमानातून 22 सदस्यांची मानवतावादी मदत ब्रिगेड आणि तिची उपकरणे नेली जातील. एएफएडीनुसार, दोन्ही विमाने शुक्रवारी सकाळी 11:15 वाजता इस्तंबूल विमानतळावरून रवाना झाली.
वर्ल्ड सेंट्रल किचनकडून भूकंपग्रस्तांना जेवण
व्हेनेझुएलातील भूकंपग्रस्त बोका दे अरोआ या किनारपट्टीच्या शहरात मदतकार्य सुरू आहे. वर्ल्ड सेंट्रल किचन या मदत संस्थेने त्यांच्या भागीदार रेस्टॉरंट्सच्या माध्यमातून बाधित लोकांना गरम जेवण पोहोचवल्याचे संस्थेने सोशल मीडियावर सांगितले.
राष्ट्राध्यक्ष रॉड्रिग्जनी घेतली भूकंपग्रस्त कुटुंबांची भेट
व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी भूकंपग्रस्त उत्तर किनारपट्टीवरील माकुटो शहराला भेट दिली. त्यांनी बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि मदतकार्याचा आढावा घेतला. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भेटीचा व्हिडिओ शेअर करताना रॉड्रिग्ज यांनी येत्या काही तासांत व्हेनेझुएलाला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सतत मदत मिळत राहील, असे त्यांनी सांगितले. व्हेनेझुएलाच्या ला ग्वायरा शहरात जवळपास 250 इमारती कोसळल्याचे व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय विधानसभेचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

जखमींची संख्या 4,300 वर
व्हेनेझुएलातील भूकंपात जखमी झालेल्यांची संख्या 4,300 वर पोहोचल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या उत्तरेकडील किनारपट्टीवरील ला ग्वायरा राज्यात मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. बाधित भागातील रुग्णालयांवर प्रचंड ताण आला आहे. या कारणास्तव, सरकारने जखमींना तातडीने उपचार देण्यासाठी तात्पुरती रुग्णालये उभारली आहेत.

Advertisement
Tags :

.