वेलिंगकरांचे विधान ही भाजपचीच खेळी
काँग्रेस प्रभारी अंजली निंबाळकर यांचा आरोप
पणजी : राज्यात गत काही दिवसांपासून गाजणारी जमीन घोटाळ्यांसारखी प्रकरणे, तसेच मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यातील विकोपाला पोहोचलेला वाद यासारख्या मुद्यांपासून जनतेचे लक्ष वळविण्यासाठीच भाजपने प्रा. सुभाष वेलिंगकर यांना पुढे काढून फ्रान्सिस झेवियर यांच्यासंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यास लावले आहे, असा दावा काँग्रेसच्या गोवा प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी केला आहे. काल बुधवारी पणजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नांडिस आणि आमदार अॅड. कार्लोस फेरेरा यांचा समावेश होता.
पुढे बोलताना डॉ. निंबाळकर यांनी राज्यात धार्मिक कलह माजवून लोकांमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र गोमंतकीयांच्या सतर्कतेमुळे तो फसला आहे. ज्या वेलिंगकर यांच्यामुळे हा वाद निर्माण झाला त्यांना पाच दिवस झाले तरी अटक होत नाही, यावरून स्वत: मुख्यमंत्री त्यांना संरक्षण देत असल्याचे सिद्ध होत आहे, असा आरोप त्यांनी केला. विद्यमान भाजप सरकार गोव्यासाठी विध्वंसक ठरले आहे. हे सरकार रिअल इस्टेट आणि भू माफियांना संरक्षण, प्रोत्साहन देत आहे. त्याचबरोबर हल्लीच्या काही दिवसात निर्माण झालेल्या विविध गंभीर मुद्यांपासून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी जाती धर्माच्या नावाने विविध समुदायांमध्ये फूट आणि द्वेष पसरविण्याचे प्रयत्न करत आहे, असे त्या म्हणाल्या.
वेलिंगकरांना मुख्यमंत्र्यांचे संरक्षण
प्रा. वेलिंगकर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि निषेधार्ह होते. परंतु स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे त्यांना संरक्षण देत आहेत. एवढेच नव्हे तर वेलिंगकर हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच लपले असण्याचीही शक्यता आहे, असे डॉ. निंबाळकर म्हणाल्या.