वेलिंगकर यांचे उच्च न्यायालयात आव्हान
आज सकाळी होणार सुनावणी : डिचोली पोलिसांची तिसरी नोटीस
पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा प्रमुख तथा हिंदु रक्षा महाआघाडीचे गोवा राज्य समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशाला काल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान याचिका सादर केली आहे. या याचिकेवर आज गुऊवारी सकाळी सुनावणी घेतली जाणार आहे. प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी रात्री उशिरा फेटाळण्यात आला होता. उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. बॉस्को रॉबर्ट यांनी वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना दिलेला निकाल मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आला. त्यामुळे वेलिंगकर यांच्या वकिलांना सदर निकालाची प्रत उशिराने मिळाल्याने त्यावरील आव्हान याचिका बुधवारी ऑनलाईन पद्धतीने दाखल करावी लागली. सदर अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती खंडपीठासमोर करण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणी डिचोली पोलिसांना आणि हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्याना नोटिसा पाठवण्यात आल्या नसल्याने त्यांना खंडपीठाकडून आणखी वेळ देण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी माहिती दिली.
न्यायालयात की पोलिसात हजेरी?
वेलिंगकर यांच्याविऊद्ध राज्यातील अनेक पोलिसस्थानकात तक्रारी नोंद झाल्या असल्या तरी डिचोली पोलिसानी त्यांच्याविऊद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. वेलिंगकर यांच्या पणजी येथील श्रीमहालक्ष्मी मंदिराजवळील घराच्या दारावर याआधी डिचोली पोलिसांनी दोन वेळा नोटिसा चिकटवल्या आहेत. मंगळवारी तिसरी नोटीस दारावर लावण्यात आली असून त्यात वेलिंगकर यांना आज गुऊवारी जबानीसाठी डिचोली पोलिसस्थानकात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे वेलिंगकर न्यायालयात की पोलिसात हजर राहणार? हा प्रश्न आहे.