वेलिंगकर डिचोली पोलिसस्थानकावर हजर
वीस मिनिटांतच आटोलपली जबानी : हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींचीही गर्दी
डिचोली : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल अटकेपासून उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर अखेर काल गुरुवारी डिचोली पोलिसस्थानकात हजर झाले. संध्या. 4 वा. पोलिसस्थानकाच्या मागील दारातून हजर झाल्यानंतर पोलिसांना जबानी देऊन अवघ्या 20 मिनिटांतच ते बाहेर पडले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डिचोली पोलिसस्थानकात दाखल झालेल्या वेलिंगकर यांची जबानी पोलिसांनी नोंद करून घेतली. येत्या सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी सदर अहवाल पोलिसांकडून न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील न्यायालयीन प्रक्रिया चालणार आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक सागर एकोसकर, निरीक्षक दिनेश गडेकर, उपनिरीक्षक व इतर पोलीस उपस्थित होते.
डीएनए चाचणीची मागणी
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी डिचोलीत त्यांनी केल्याबद्दल त्यांना सर्वत्र लक्ष्य बनविण्यात आले होते. गोव्यातील विविध पोलिसस्थानकांमध्ये त्यांच्या विरोधात तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. याबाबत डिचोली पोलिसस्थानकावर आमदार क्रूज सिल्वा यांनी तक्रार नोंदविल्यानंतर डिचोली पोलिसांनी सदर गुन्हा नोंदविला होता. त्यामुळे प्रा. वेलिंगकर यांना अटक करून कोणत्याही क्षणी डिचोलीत आणले जाईल, अशी आशा होती. पण तशी वेळ आली नाही.
डिचोली पोलिस वेलिंगकर यांच्या शोधात होते. तीन वेळा त्यांना चौकशीसाठी डिचोली पोलिसस्थानकावर उपस्थित राहण्याची नोटीसही बजावली होती. मात्र ते उपस्थित राहिले नव्हते. बुधवार 9 ऑक्टोबर रोजी त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. त्यांना चौकशीसाठी गुरुवारी डिचोली पोलिसस्थानकावर हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर वेलिंगकर काल गुऊवारी हजर राहिले.
वेलिंगकर समर्थकांची गर्दी
न्यायालयाच्या निर्देशानुसार वेलिंगकर डिचोली पोलिसस्थानकावर हजर राहणार असल्याची कल्पना सर्वांनाच मिळाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा स्थानकावर तैनात करण्यात आला होता. विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी, वेलिंगकर यांचे चाहते, समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. संपूर्ण गोव्यात लक्षवेधी ठरलेले वेलिंगकर डिचोली पोलिसस्थानकावर येणार असल्याने डिचोलीसह पणजीतूनही पत्रकार आले होते, परंतु वेलिंगकर पोलिसस्थानकात कधी गेले हे कोणाला कळलेच नाही. नंतर 20 मिनिटांनी ते बाहेर आले अन् गाडीत बसून निघूनही गेले. त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबलेल्या पत्रकारांचा अपेक्षाभंग झाला. वेलिंगकर दाखल झाल्यानंतर काहीच वेळाने उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल पोलिसस्थानकावर दाखल झाले होते.