For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

शंभर टक्के इथेनॉल वाहनांना अनुमती

06:55 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
शंभर टक्के इथेनॉल वाहनांना अनुमती
Advertisement

वाहन नियमांमध्ये केंद्र सरकारकडून मोठे परिवर्तन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हरित इंधन आणि प्रदूषणमुक्त परिवहन यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना अनुमती दिली आहे. यासाठी वाहन नियमांमध्ये महत्त्वपूर्ण परिवर्तन करण्यात आले आहे. या परिवर्तनामुळे देशात 100 टक्के इथेनॉलवर (ई-100) चालणाऱ्या वाहनांची निर्मिती आणि विक्री करणे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे अनेक कार कंपन्या भारतात अशा वाहनांची विक्री करण्यासाठी सज्जता करीत आहेत. या वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन अत्यल्प असल्याने ही वाहने पर्यावरणस्नेही असतात. हे नियम परिवर्तन केवळ केवळ अशा प्रकारच्या नव्या कार्ससाठीच आहे. सध्याच्या कार्स सध्याच्याच नियमांप्रमाणे धावणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

सध्या भारतात 85 टक्के इथेनॉल असणाऱ्या इंधनावर चालणाऱ्या कार्सना अनुमती देण्यात येते. तथापि, आता या श्रेणीत 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कार्सचाही समावेश करण्यात आला आहे. ई-85 आणि ई-100 प्रकारच्या वाहनांना वाहन विभागाकडून विशेष प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. अशा प्रकारच्या कार्सची इंजिने वेगळ्या डिझाईनची असतात. सर्वसामान्य कार्समध्ये अशा प्रकारचे उच्च इथेनॉल इंधन उपयोगात आणले जात नाही. त्यामुळे अशा विशेष कार्सना केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे.

सध्याच्या कार्सवर परिणाम नाही

80 टक्के आणि 100 टक्के इथेनॉलच्या कार्सना अनुमती देण्यात आली आहे, याचा अर्थ सध्या उपयोगात असणाऱ्या कार्सनाही अशा प्रकारच्या इंधनांचा उपयोग करण्याची सक्ती करण्यात येणार आहे, असा मुळीच नाही. सध्या ज्या कार्स अस्तित्वात आणि उपयोगात आहेत, त्यांच्यासाठी सध्याचेच नियम लागू आहेत. वाहन नियमांमध्ये करण्यात आलेले हे परिवर्तन केवळ 85 टक्के किंवा 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या नव्या डिझाईनच्या कार्ससंबंधी आहे. त्यामुळे सध्याच्या वाहनधारकांना कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले गेले आहे.

कोणतीही सक्ती नाही

केंद्र सरकारने वाहन नियमांमध्ये परिवर्तन केले असले, तरी सध्याच्या कार्सचे रुपांतर ‘ई-85’ किंवा ‘ई-100’ कार्समध्ये करण्याची कोणतीही आवश्यकता आत्ता किंवा भविष्यातही लागणार नाही. सध्याची वाहने सध्याच्याच नियमांप्रमाणे पुढेही उपयोगात आणली जाऊ शकतात. त्यांच्यावर या नियम परिवर्तनाचा कोणताही परिणाम होणार नाही. सध्याच्या वाहनांमध्ये आत्ता किंवा भविष्यात कोणतीही सुधारणा करावी लागणार नाही, असेही प्रतिपादन वाहन विभागाने केले आहे.

अनेक देशांमध्ये अशा कार्स

85 टक्के किंवा 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कार्सचा उपयोग अनेक देशांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. ब्राझील आणि अमेरिका या देशांमध्ये अशा कार्स लाखोंच्या संख्येने आहेत. भारतातही त्या उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे नियमांमध्ये परिवर्तन करुन अशा कार्सना भारतात अनुमती देण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणस्नेही कार्सच्या उपयोगाला भारतात प्रोत्साहन मिळेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

100 टक्के इथेनॉलचे लाभ

  1. अशा इंधनाच्या कार्समुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार आहे. हे इंधन जळल्यानंतर त्यातून कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डाय ऑक्साईड यांचे उत्सर्जन अत्यंत अल्प प्रमाणात होते. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे.
  2. इथेनॉलची निर्मिती देशातच होत असल्याने कार्बनयुक्त कच्च्या इंधन तेलाची आयात कमी होणार आहे. भारताला सध्या त्याच्या आवश्यकतेच्या 90 टक्के तेल आयात करावे लागते. हे भारताचे अवलंबित्व इथेनॉलमुळे बरेच कमी होणार आहे.

ड नियमांमधील बदल आहेत केवळ ई-85 आणि ई-100 कार्सकरीताच

ड सध्या असणाऱ्या कार्सवर या इंधनांच्या उपयोगाची कोणतीही सक्ती नाही

ड सध्याच्या कार्समध्ये आत्ता किंवा भविष्यात कोणतेही बदल सक्तीचे नाहीत

Advertisement
Tags :

.