साडेचार महिन्यांनंतर धावली ताड-माड रस्त्यावर वाहने
इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडकडून काम पूर्ण
प्रतिनिधी/ पणजी
इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीद्वारे राजधानी पणजीत विकासकामे राबविण्यात आली. त्यामध्ये सांतईनेज येथील ताड-माड रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे हा रस्ता सुमारे साडेचार महिन्यांनंतर वाहतुकीस शनिवारपासून खुला करण्यात आला.
सांतईनेज येथील ताड माड ते सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे (एसटीपी) जाणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे व्हावे, यासाठी तो बंद ठेवण्यात आला होता. आता या रस्त्याचे काम आणि ऊंदीकरणही झाल्याने नागरिकांनी इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे आभार मानले.
स्मार्ट सिटीच्या कामांसाठी ताड माड रस्ता 18 जानेवारीपासून बंद होता. हा रस्ता पुन्हा सुरू झाल्याने सांतईनेज येथून टोंका, मिरामार, करंजाळे या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांना आता कोणतीच अडचण नाही. दयानंद बांदोडकर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण आजपासून कमी झाला आहे.
ताड माड ते टोंक, एसटीपी पर्यंतचा 200 मीटरचा रस्ता तयार करताना येथील सांडपाणी वाहिनी घालण्याचे काम आव्हान बनले होते. सुमारे 710 मिमी व्यासाच्या ट्रंक सीव्हरेज लाईन घालण्यासह अन्य कामे या ]िठकाणी सुरू होती. मॅनहोल, घर जोडणी चेंबर, सेवा वाहिन्या आणि क्रॉसिंग बांधणे आदी गोष्टी विचारात घेण्यात आल्या होत्या. आता ही सर्व कामे झाल्याने या परिसरातील स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणार आहे, असे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंदिर, वटवृक्ष वाचवला, पादचाऱ्यांचाही विचार
सांडपाणी वाहिनी जोडणीच्या कामास उशिर झाल्याने ताड माड रस्ता पूर्ण होण्यास वेळ लागला. या ठिकाणी सांडपाणी वाहिनी घालताना पाण्याची सतत पातळी वर खाली होत होती. यासाठी येथे पाणी उपसून टाकणारे आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेले मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेला वटवृक्ष याला कोणताही धोका न लावता हे काम स्मार्ट सिटीने पूर्ण केले आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पदपथ जोडून, उच्च दर्जाचे काँक्रिट वापरून रस्त्याचे पृष्ठभाग पूर्ण करण्यात आला असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले.