मे महिन्यात वाहन विक्री राहिली मजबूत
मारुतीने 2 लाखावर केली वाहन विक्री : टीव्हीएसची चांगली कामगिरी
त. भा. वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय ऑटो क्षेत्रासाठी मे महिना हा खास राहिला आहे. वाहनांची या महिन्यामध्ये मजबूत मागणी नोंदवली गेली आहे. देशातील दिग्गज मोटार वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने मे महिन्यात 2.43 लाख इतक्या वाहनांची विक्री करत विक्रम नोंदवला आहे.
मे महिन्यात एसयूव्ही, ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक वाहने आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये तेजी पहायला मिळाली. अर्थात सर्वच वाहन कंपन्यांची कामगिरी समानच झाली असे नाही. टीव्हीएस मोटर, मारुती सुझुकी, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज ऑटो आणि एस्कॉर्ट कुबोटा यांची विक्री समाधानकारक झाली आहे. ह्युंडाई मोटर इंडियाची विक्री मात्र अपेक्षेपेक्षा कमी दिसून आली. मे महिन्यामध्ये आकडेवारी पाहिल्यास ग्रामीण भागातून मागणी चांगली राहिली. विशेषत: ट्रॅक्टर विक्रीत दमदार वाढ दिसून आली. इलेक्ट्रिक वाहनांची मागणीसुद्धा सातत्याने वाढलेली दिसून आली.
टाटा मोटर्स
टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत समाधानकारक वाढ दिसून आली. कंपनीने वर्षाच्या आधारावर 17 टक्के वाढीसोबत 32850 व्यावसायिक वाहनांची विक्री मेमध्ये केली. देशांतर्गत वाहनांची विक्री कंपनीची 19 टक्के वाढत 30784 इतकी राहिली. परंतु असे जरी असले तरी निर्यातीत मात्र दबाव पहायला मिळाला. कंपनीने मे महिन्यामध्ये 2066 व्यावसायिक वाहनांची निर्यात केली. ही मागच्या तुलनेमध्ये 9 टक्के कमीच होती. पण देशांतर्गत मजबूत मागणीचा कंपनीने पुरेपूर फायदा उठविला.
टीव्हीएस मोटर
टीव्हीएस मोटरने मे महिन्यात पुन्हा एकदा चांगले प्रदर्शन केले. त्यांची एकूण वाहन विक्री 31 टक्के वर्षाच्या आधारावर वाढलेली होती. सर्व प्रमुख गटामध्ये कंपनीने 30 टक्क्यांपेक्षा अधिक वृद्धी दर्शवली. इलेक्ट्रिक वाहन विक्रीमध्ये कंपनीने नवा विक्रम प्रस्थापित केला. मे महिन्यात 44 हजार इतक्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. मागच्या वर्षाच्या तुलनेत विक्री 56टक्के अधिक होती.
मारुती सुझुकी
देशातील आघाडीवरची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनेही मेमध्ये दमदार वाहन विक्री नोंदणी केली. एकूण 35 टक्के वाढीसकट कंपनीने 2.43 लाख वाहनांची विक्री केली. यामध्ये देशांतर्गत विक्री 2 लाख वाहनांची राहिली होती. कंपनीने एसयूव्ही गटामध्ये 79267 इतक्या वाहनांची विक्री केली. जी मागच्या मे महिन्यामध्ये 54899 इतकी होती.