वाहन, ग्राहक कंपन्यांना ग्रामीण बाजारातून आशा
मागणी सुधारणार असल्याचे संकेत : टॅक्टरसह इतर वस्तुंची मागणी वाढली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऑटोमोबाईल कंपन्यांकडून ग्रामीण भागातील मागणी वाढताना दिसत आहे, जी गेल्या आर्थिक वर्षातील बहुतांश काळ सुस्त होती. बंपर रब्बी हंगामाच्या अपेक्षेने वातावरण बदलले असून ग्रामीण भागातील विक्रीला वेग आला आहे. गेल्या आठवड्यात, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखालील चलनविषयक धोरण समितीने रेपो दर जैसे थे ठेवला होता. त्या बैठकीत त्यांनी ग्रामीण भागावर भाष्य करताना तेथील मागणी जोर धरत आहे आणि वाढीव खप आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आर्थिक वाढीस समर्थन देऊ शकते असे नमूद केले होते.
वर्ष 2023-24 मध्ये, ट्रॅक्टर उद्योगाच्या विक्रीत वार्षिक आधारावर सुमारे 5 टक्के घट झाली. तथापि, ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशनच्या (टीएमए) वेबसाइटवर अद्याप अंतिम आकडेवारी स्पष्ट केलेली नाही. शेतीतील मंदगती, पीक पेरणीला उशीर आणि रब्बीच्या पेरण्या कमी झाल्यामुळे ट्रॅक्टर विक्रीत घट झाली.
महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या कृषी उपकरणे क्षेत्र विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का, म्हणाले, ‘आम्ही मार्च 2024 मध्ये देशांतर्गत बाजारात 24,276 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. फलोत्पादन उत्पादनासाठी वाढीव आगाऊ अंदाज आणि गव्हाचे उत्पादन अधिक चांगले असल्याने शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरची मागणी वाढू शकते. यावर्षी दक्षिण-पश्चिम मान्सून सामान्य राहण्याची अपेक्षा असल्याने येत्या काही महिन्यांत ट्रॅक्टरची मागणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
सियामचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, तिसऱ्या तिमाहीतील (ऑक्टोबर-डिसेंबर) विक्रीचे आकडे एप्रिल-डिसेंबरच्या तुलनेत चांगले आहेत. ते म्हणाले, ‘उदाहरणार्थ, तिसऱ्या तिमाहीत दुचाकी विक्रीत 23 टक्क्यांनी वाढ झाली, परंतु एप्रिल ते डिसेंबरदरम्यान ती केवळ 10 टक्क्यांनी वाढली.’
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2024 च्या उत्तरार्धापासून ग्रामीण मागणीला वेग आला आहे. ते म्हणाले, ‘या वर्षी अल निनोचा प्रभाव कमी झाला आहे, त्यामुळे आम्हाला आशा आहे की 2024-25 हे आर्थिक वर्ष ग्रामीण मागणीच्या दृष्टीने चांगले असणार आहे.
एफएमसीजी कंपन्यांची ग्रामीण मागणीही सुधारत आहे. पार्ले प्रोडक्ट्सचे वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयंक शाह म्हणाले, ‘फेब्रुवारीपासून आमच्यासाठी काही चांगली चिन्हे दिसू लागली आहेत. आम्हाला आशा आहे की रब्बी पीक चांगले असल्याने ग्रामीण भागातील मागणीत चांगली सुधारणा होईल.
कापणीचा हंगाम सुरू झाला असून, चांगले पीक येण्याच्या अपेक्षेने मागणी वाढू लागली आहे. आमच्या श्रेणीमध्ये, आम्ही गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या तुलनेत ग्रामीण क्षेत्रात 4 टक्के वाढ पाहत आहोत, तर शहरी मागणी 2 ते 2.5 टक्क्यांनी वाढली आहे.
ग्रामीण मागणी मजबुत: शक्तिकांत दास
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले होते, ‘ग्रामीण मागणी, जी पूर्वी शहरी मागणीच्या तुलनेत मागे होती, 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीपासून वेग घेत आहे. दुचाकी विक्री (जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान 30.3 टक्क्यांनी वाढली), मनरेगाची मागणी (फेब्रुवारी-मार्च 2024 दरम्यान 9.8 टक्क्यांनी वाढली) आणि ट्रॅक्टरची किरकोळ विक्री (जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान 16.1 टक्क्यांनी वाढली) इतकी झाली आहे. हे पाहता ग्रामीण भागातून मागणी वाढत आहे.