For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'उत्तरमांड'च्या भिंतीला झाडाझुडपांचा धोका

01:59 PM Jul 23, 2025 IST | Radhika Patil
 उत्तरमांड च्या भिंतीला झाडाझुडपांचा धोका
Advertisement

चाफळ :

Advertisement

गमेवाडीनजीक आलेल्या उत्तरमांड मध्यम प्रकल्पाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात वाढलेल्या विविध झाडाझुडपांचा अक्षरशः विळखा पडला आहे. बेसुमार वाढलेल्या झाडांच्या मुळ्यांपासून या धरणाला संभाव्य धोका निर्माण झाला आहे. मात्र धरण व्यवस्थापनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने निसर्गप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी पाटण तालुक्यातील महिंद धरणाची संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली होती. अशा घटना इतर धरणांच्या बाबतीत घडू नयेत, यासाठी संबधितांनी तातडीने उत्तरमांड धरणाच्या भिंतीवर व आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडेझुडपे हटवून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी होत आहे.

सुमारे २० वर्षांपूर्वी गमेवाडीनजीक उत्तरमांड प्रकल्प साकारण्यात आला आहे. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणात ७५ टक्के पाणीसाठा करण्यास प्रारंभ झाला. मात्र धरणाच्या भिंतीवर तसेच आजूबाजूला वाढलेली विविध प्रकारची झाडेझुडपे धरण व्यवस्थापनाकडून वेळोवेळी काढण्यात कुचराई केली जात आहे. त्यामुळे धरणाच्या भिंतीवर मोठमोठ्या झाडाझुडपांनी अक्षरशः विळखा घातला आहे. भिंतीच्या खाली व धरणाच्या आतील भिंतीवरही मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहेत. झाडाच्या मुळ्या धरणाच्या भिंतीत खोलवर गेल्या आहेत. त्यामुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे.

Advertisement

धरणाच्या भिंतीवर तसेच आतील भागात बाभूळ, आंबा, करंज, जांभूळ, निलगिरी, सुबाभूळ, सागवान अशा विविध प्रकारच्या झाडांनी विळखा घातला आहे. व्यवस्थापनाकडून धरण परिसरात स्वच्छता राखणे क्रमप्राप्त आहे. यासाठी संबंधित विभागाने वेळीच दखल घेऊन भविष्यात धरणाला व धरणाच्या खाली असणाऱ्या गावांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन धरण परिसरातील झाडी काढून टाकावी, अशी मागणी ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त व पर्यटकांमधून होत आहे.

  • तळीरामांचा अड्डा...

उत्तरमांड धरणाच्या भिंतीवर बेसुमार वाढलेल्या झाडीमुळे हा संपूर्ण परिसर तळीरामांसह प्रेमीयुगलांचा अड्डाच बनला आहे. बाहेरून येणारी शालेय प्रेमीयुगले या परिसरात वाढलेल्या झाडाखाली बसून अश्लिल चाळे करत असल्याचे दिसून येत आहेत. तर काही तळीराम रात्रंदिवस धरणाच्या भिंतीवरच तळ ठोकून बसलेले असतात. त्यामुळे धरण परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला पहावयास मिळत आहे.

Advertisement
Tags :

.