For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यान्ह आहारातून भाजीपाला-कडधान्य गायब

11:41 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्यान्ह आहारातून भाजीपाला कडधान्य गायब
Advertisement

वाढत्या दराचा परिणाम, निधी मात्र तोकडाच

Advertisement

बेळगाव : भाजीपाला, मसाले, कडधान्यांचे दर गगनाला भिडले असताना मधान्ह आहारासाठी मात्र सरकारचा कंजुषपणा सुरू आहे. यामुळे मध्यान्ह आहारातील भाजीपाला, कडधान्य गायब झाले आहे. केवळ डाळ-भातावर विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागत आहे. आहारासाठी तुटपुंजा निधी दिला जात असल्याने शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने ओल्या भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. केवळ भाजीपालाच नव्हे तर मसाले, कडधान्य यांचेही दर कमालीचे वाढले आहेत. पहिली ते पाचवीपर्यंतच्या एका मुलामागे 1 रुपये 93 पैसे तर सहावी ते दहावीच्या एका मुलामागे 2 रुपये 80 पैसे निधी दिला जातो. तर अंडी खरेदीसाठी पाच रुपये दिले जातात. परंतु या दरात भाजीपाला खरेदी करणे शक्य होत नाही. राज्यात 51 लाख 23 हजार 537 सरकारी शाळांमधील विद्यार्थी मध्यान्ह आहाराचा आस्वाद घेतात. पहिली ते पाचवीमध्ये 24 लाख 56 हजार, सहावी ते आठवीमध्ये 15 लाख 46 हजार, नववी व दहावीमध्ये शिकणारे 11 लाख 20 हजार विद्यार्थी मध्यान्ह आहार घेतात. बिन्स, कांदा, वांगी, मुळा, भेंडी, टोमॅटो यांचे दर कमालीचे वाढले असल्याने सरकारी दरात आहार कसा उपलब्ध करून द्यायचा? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.

प्रति अंड्यामागे 7 रुपये खर्च; सरकारकडून निधी 5 रुपये!

Advertisement

शाळांमध्ये अंड्यांचे वितरण केले जाते. अंडी खरेदी करून उकडून विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रति अंड्यामागे 7 रुपये खर्च येतो. मात्र सरकारकडून 5 रुपये निधी दिला जात असल्याने उर्वरित खर्च शिक्षक व शाळा सुधारणा समितीला करावा लागत आहे.

Advertisement
Tags :

.