सोलापूर बाजार समितीत भाजीपाला लिलाव दिवसातून दोन वेळा
सभापती दिलीप माने यांचा धाडसी निर्णय
दक्षिण सोलापूर :
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आता ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळा भाजीपाल्याचे लिलाव होणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून (ता. २६ जून) सुरु होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली.
या निर्णयामागे एक खास पार्श्वभूमी आहे. मागील आठवड्यात माने यांनी मंगळवारी पहाटे ४:४० वाजता अचानक स्वतःच्या दुचाकीवर तोंडाला मफलर गुंडाळून मार्केट यार्डात फेरफटका मारला. या अचानक भेटीत त्यांना व्यापाऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या, हमालांची गैरसोय आणि खरेदी-विक्रीतील त्रुटी प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. दिवसा कार्यालयात बसून हे प्रश्न समजून घेणे शक्य नसते, हे लक्षात घेऊन त्यांनी अशा अनपेक्षित भेटी सुरू केल्या आहेत.
त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे सकाळी व संध्याकाळी दोन वेळा लिलाव घेण्याची मागणी केली होती. आज पुन्हा काही शेतकऱ्यांनी ती मागणी ठामपणे मांडली असता, माने यांनी जागेवरच हा निर्णय घेतला. गुरुवारपासून सकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता अशा दोन वेळा लिलाव होणार आहेत.
- शेतकऱ्यांना दिलासा
या निर्णयामुळे पहाटेच्या वेळेस होणारी गर्दी कमी होईल, शेतकऱ्यांना यार्डात मुक्काम करण्याची गरज भासणार नाही. त्यांना आपल्या सोयीने भाजीपाला विक्रीसाठी आणता येणार आहे. विशेषतः लांबून येणाऱ्या शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होईल.
- रिक्षाचालकांच्या व्यथा ऐकून घेतल्या
सध्या मार्केट यार्डमध्ये रिक्षाचालकांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. यासाठी समितीने विशेष कर्मचारी तैनात केले आहेत. मात्र, आजच्या पहाटेच्या भेटीत काही रिक्षाचालकांनी सभापती माने यांना कामानिमित्त प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावर माने यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, "या निर्णयावर फेरविचार केला जाईल," असा दिलासा दिला.
- शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद
"भाजीपाला लिलाव दोन वेळा व्हावा, ही आमची मागणी अनेक वर्षांपासून आहे. पण याकडे कुणीही लक्ष दिले नाही. माने यांनी घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे."
– प्रमोद शिंदे, माजी सरपंच, औराद
"ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही फार मोठी सोय होईल. ग्राहकांनाही ताजा भाजीपाला मिळणार असून शेतकऱ्यांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे."
– दिलीप माने, सभापती, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती