For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांखळीच्या चैत्रोत्सवात उद्या रोमांचकारी वीरभद्र

12:33 PM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
सांखळीच्या चैत्रोत्सवात उद्या रोमांचकारी वीरभद्र
Advertisement

वीरभद्राची भूमिका बजावणारे सुनील शिरोडकर सज्ज : वीरभद्र उत्सव भाविकांसाठी अत्यंत उत्कंठावर्धक

Advertisement

पणजी : सांखळीच्या चैत्रोत्सवाचा उद्या अखेरचा दिवस आणि या संपूर्ण उत्सवाचे खास आकर्षण असलेला वीरभद्र हा संपूर्ण गोव्यातून वेगळ्या धरतीवरचा उत्सव रविवारी पहाटे साडेचार वाजता चैत्रोत्सवाच्या मंडपात पाहायला मिळणार आहे. यासाठी वीरभद्राची भूमिका बजावणारे सुनील शिरोडकर सज्ज झाले आहेत. सांखळीच्या श्री विठ्ठल मंदिराला 550 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे आणि या मंदिराच्या काही वेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. त्यात चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमा या दरम्यान होणारा वार्षिक चैत्रोत्सव हा एक मुख्य उत्सव असून त्या उत्सवाची सांगता रथोत्सवाने होते. तत्पूर्वी पहाटे साडेचार वाजता होणारा वीरभद्र उत्सव हा अत्यंत उत्कंठावर्धक आणि सर्वांची छाती धडधडून टाकणारा असतो.

सांखळीचा वीरभद्र अनोखा

Advertisement

गोव्यात विविध ठिकाणी वीरभद्र उत्सव होतो परंतु सांखळीचा वीरभद्र पाहणे अनोखी पर्वणी असते. वीरभद्राचे मंडपात येणे आणि एका विशिष्ट पद्धतीच्या तालवाद्यावर त्याची पडणारी पावले, हातात युद्धभूमीवरील खऱ्या तळपत्या तलवारी हे सारे पाहिल्यानंतर आणि मंडपात त्याचे होणारे फेरे आणि नंतर येणारा अवसर अंगावर काटा उभा करणारा असतो.  गोव्याच्या कानाकोप्रयातून मंडळी इथे येतात. सध्या सुनील शिरोडकर वीरभद्राची भूमिका बजावतात. ते आज 54 वर्षाचे आहेत. त्यांनी ही परंपरा आपले वडील रोहिदास शिरोडकर यांच्याकडून घेतली.

शिरोडकरांच्या चार पिढ्यांची परंपरा 

सुनील शिरोडकर यांच्या आतापर्यंत चार पिढ्या ही परंपरा चालवीत आली आहे. सुमारे दीडशे वर्षे या घराण्यात वीरभद्राची परंपरा चालवली जात आहे. अर्जुन शिरोडकर यांनी कैकवर्षे ही परंपरा चालवली. त्यांचे चिरंजीव श्रीधर शिरोडकर यांनी ही परंपरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यानंतर रोहिदास शिरोडकर यांनी सुमारे 30 ते 40 वर्षे ही परंपरा चालविली. त्यानंतर 2009 पासून सुनील शिरोडकर गेली सतरा वर्षे ही परंपरा चालवीत आहेत. ही सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळते याचा आनंद आहे. प्रत्यक्ष जेव्हा आपण वीरभद्राचे रूप साकारतो तेव्हा आपण सारे काही विसरून जातो आणि केवळ आपल्यासमोर तालवाद्य आणि त्या आधारावर आपण पावले टाकायची, आणि समोर एकच आवाज येतो भूपराज.

भूपराज यांचा अर्थ 

भूपराज याचा अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याच्या मागे जाल तर आपल्या लक्षात येते की पौराणिक कथा आपल्याला असे सांगते की दक्ष राजाने जेव्हा यज्ञ आयोजित केला होता त्यावेळी त्यांनी आपले जावई शंकर आणि कन्या पार्वती या दोघांना निमंत्रण दिले नाही तथापि पार्वती विना निमंत्रण तिथे गेली. वडील तिचा अवमान करतात. शंकराला वाटेल तसे बोलतात. त्या रागाने पार्वती अग्निप्रवेश करते. शंकराला जेव्हा हे कळते त्यावेळी तो थयथयाट करतो आणि तिसरा नेत्र खुला करतो. एवढे करून राहत नाही तर आपली जटा ते काही केस काढून ते एका पर्वतावर आपटतो आणि त्यातून वीरभद्र निर्माण होतो जो नंतर दक्षाचा वध करतो.

तेव्हा पुढे आले शिरोडकर

चैत्रोत्सवात दरवर्षी मामा मोचेमाडकर दशावतारी नाट्या मंडळ दशावतारी नाटक सादर करत असते. श्रींची पालखीतून मिरवणूक झाल्यानंतर ही नाटके सुरू होतात. अखेरच्या दिवशी पहाटे नाटक संपते, त्यामध्ये वीरभद्राचे आख्यान लावले जाते. पूर्वीच्या काळात मोचेमाडकरमधील एक पात्र वीरभद्राची भूमिका बजावीत होते परंतु, नंतर एक मोठा प्रसंग निर्माण झाला आणि त्यानंतर दशावतार कंपनीने पात्र रंगवण्यास नकार दिला. त्यावेळी हे पात्र रंगवण्यास कोणीच तयार होईना, कारण वीरभद्राचा अवसर आल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाते. अशावेळी 150 वर्षांपूर्वी अर्जुन शिरोडकर यांनी पुढाकार घेतला आणि स्वत: वीरभद्रचे रूप आणि सादरीकरण करण्याची तयारी दर्शविली तिथपासून आजपर्यंत ही प्रथा आणि परंपरा शिरोडकर कुटुंबीय सांभाळतात.

सुनील शिरोडकर हे रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत केवळ शाकाहार आणि इतर देव कार्यामध्ये सहभागी होत राहतात. हनुमान जयंती दिवशी ते कडक उपास करतात आणि त्यानंतर पहाटे वाळवंटीकिनारी पुंडलिक मंदिरात त्यांना रंगविण्यात येते.  पालखी पहाटे पुंडलिकाच्या भेटीला जाऊन येते ती वर आल्यानंतर वीरभद्र रंगवून माऊती मंदिरात येतो माऊतीचे दर्शन घेतल्यानंतर तिथेच प्रभावळ बांधली जाते. ही प्रभावळ म्हणजे शंकराचा हात आणि शाबासकीची थाप असे मानले जाते आणि त्यातून वीरभद्राचे विराट दर्शन हजारो नागरिकांना होते. सांखळीचे वज्रजीत दुभाषी हे राणे कुटुंबीयांकडून आणलेल्या तळपत्या तलवारी त्याच्या हातात देतात. त्यानंतर वीरभद्र अग्निप्रवेश करतो. मग ताल वाद्यावर त्याचा प्रवेश मंडपात सुरू होतो. ज्या ज्या वेळी पावले टाकून वीरभद्र खाली टेकतो त्यावेळी भूपराज असा नारा लगावून त्याला पुन्हा उठविले जाते. त्या आवेशाने आणि तालवाद्यांच्या सुरामध्ये मंडपात फेरे टाकताना त्याच्यावर अवसर येतो. भूपराज याचा अर्थ भूमीतून आलेला पुत्र असे आहे. हा वीरभद्र अवसर आल्यानंतर त्याला आवरणे फार कठीण काम असते. हा वीरभद्र कसा असतो, तर उत्कंठा वाढविणारा, छाती घडधडविणारा आणि अंगावर रोमांच उभे करणारा. त्याचा प्रत्यक्ष अनुभव उद्या रविवारी पहाटे घेता येईल.

Advertisement
Tags :

.