वेदांत कलिंगा लान्सर्स एचआयएल विजेते
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर, ओडिशा
वेदांत कलिंगा लान्सर्सने कलिंगा हॉकी स्टेडियमवर घरच्या प्रेक्षकांसमोर एका रोमांचक अंतिम सामन्यात रांची रॉयल्सचा 3-2 ने पराभव करून पुऊषांच्या हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद पटकावले. लान्सर्सकडून अलेक्झांडर हेन्ड्रिक्स (4 थे मिनिट आणि 27 वे मिनिट) आणि दिलप्रीत सिंग (25 वे मिनिट) यांनी त्यांचे गोल केले. रांची रॉयल्सकडून अराईजित सिंग हुंदल (9 वे मिनिट) आणि कर्णधार टॉम बून (59 वे मिनिट) यांनी गोल केले.
हॉकी इंडिया लीगने विजेत्या वेदांत कलिंगा लान्सर्सला 3 कोटी ऊपये, उपविजेत्या रांची रॉयल्सला 2 कोटी ऊपये आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या हैदराबाद तुफान संघाला 1 कोटी ऊपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हैदराबाद संघाने दिवसाच्या सुऊवातीला एचआयएल जीसी संघाचा पराभव केला. एचआयएल जीसी संघाला ‘फेअरप्ले’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडू ड्रॅगन्सचा गोलरक्षक प्रिन्स दीप सिंगने स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार जिंकला, तर एचआयएल जीसीच्या तालेम प्रियोबर्ताने स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार पटकावला. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 10 लाख ऊपये मिळाले.
रांची रॉयल्सचा कर्णधार टॉम बूनने 19 गोल करून स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा पुरस्कार जिंकला आणि त्याला 10 लाख ऊपये मिळाले, तर हैदराबाद तुफानच्या अमनदीप लाकराला स्पर्धेतील हिरो खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आणि त्याला 20 लाख ऊपयांचे बक्षीस देण्यात आले.
अंतिम सामन्यात चौथ्या मिनिटाला वेदांत कलिंगा लान्सर्सला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि अलेक्झांडर हेन्ड्रिक्सने रांची रॉयल्सच्या गोलरक्षकाला चकवत एका जोरदार ड्रॅगफ्लिकद्वारे गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र ही आघाडी काही मिनिटेच टिकली, कारण रॉयल्सने एका प्रभावी फील्ड गोलद्वारे बरोबरी साधली. नवव्या मिनिटाला यशदीप सिवाचने डाव्या बाजूने चेंडू उंच उडवून दुसरीकडे पास केला आणि अराईजीत सिंग हुंदलला तो मिळाला. त्याने जाळीत एक जोरदार फटका मारून गोल करत बरोबरी साधली.
दुसऱ्या सत्रामध्ये वेदांत कलिंगा लान्सर्सने दोन गोल करून सामन्याचे चित्रच पालटून टाकले. रांची रॉयल्स जोरदार आक्रमक खेळ करत होते, तथापि, लान्सर्सने सलग पेनल्टी कॉर्नर मिळवून रॉयल्सला त्यांच्याच मैदानात रोखून धरले. 25 व्या मिनिटाला वेदांत कलिंगा लान्सर्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि जरी अलेक्झांडर हेन्ड्रिक्सचा ड्रॅगफ्लिक सुऊवातीला रांची रॉयल्सचा गोलरक्षक सूरज करकेराने वाचवला, तरी दिलप्रीत सिंगने चेंडूवर झडप घालून तो गोलमध्ये ढकलत संघाला आघाडी मिळवून दिली. दोन मिनिटांनंतर लान्सर्सला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळी अलेक्झांडर हेन्ड्रिक्सने पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात एक जोरदार ड्रॅगफ्लिक मारून मध्यंतरापर्यंत आघाडी वाढवली.