वेदांता ग्रुप अध्यक्ष अनिल अग्रवाल यांना पुत्रशोक
स्कीइंग करताना अग्निवेश झाले होते जखमी
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले आहे. अमेरिकेत स्कीइंग करताना अग्निवेश जखमी झाले होता. त्यांना न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याचदरम्यान 7 जानेवारी 2026 रोजी रुग्णालयात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. वडील अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या पुत्राच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘आम्हाला वाटले की सर्वात वाईट काळ संपला आहे, परंतु नशिबाने आपल्यासाठी काहीतरी वेगळेच ठेवले होते.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निवेश अग्रवाल यांच्या मृत्यूबाबत शोकभावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.अग्निवेश अग्रवाल यांचा जन्म 3 जून 1976 रोजी पाटणा येथे झाला होता. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण अजमेर येथील मेयो कॉलेजमध्ये पूर्ण केले. अग्निवेश अग्रवाल यांच्या लग्नाची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही, परंतु काही माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांनी 2001 मध्ये पूजा बांगरशी लग्न केले. पूजा ही श्री सिमेंटच्या व्यवस्थापकीय संचालक हरी मोहन बांगर यांची मुलगी आहे. अग्निवेशची बहीण प्रिया अग्रवाल हेब्बर ही सध्या सध्या हिंदुस्तान झिंकच्या अध्यक्षा आणि वेदांता ग्रुपमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करते.