वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; एलसीबीचा खंडेराजुरी-गुंडेवाडी रस्त्यावर सापळा
11:00 PM Oct 22, 2026 IST | ABHIJEET RANJANE
Advertisement
सांगली : जिल्ह्यात गाजलेल्या 14 वर्षीय वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. विशाल बिरुदेव चौगुले (वय 30, रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खंडेराजुरी ते गुंडेवाडी रस्त्यावर 19 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
विशाल चौगुले याला यापूर्वीच्या एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, सध्या तो जामिनावर बाहेर होता. वेदांत बंडगर हत्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता.
Advertisement
11 जून 2026 रोजी 14 वर्षीय वेदांत बंडगर याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.
एलसीबीच्या पथकाने खंडेराजुरी-गुंडेवाडी रस्त्यावर सापळा रचून विशाल चौगुले याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Advertisement
Advertisement