'वंचित'ची 'इंडिय़ा'कडे 12 लोकसभा जागांची मागणी! आंबेडकरांचा समान जागा वाटपाचा प्रस्ताव
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केल्यानंतर आघाडीअंतर्गत समसमान जागावाटपाचे सुत्र ठरवून त्याप्रमाणे 12 लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडी (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विकास आघाडी (MVA) सोबत जागावाटपासाठी 12 लोकसभेच्या जागांची मागणी करताना अटींवरच युती करण्याची तयारी दर्शवली आहे. प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीअंतर्गत समसमान जागा वाटपाचे सुत्र सांगताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि वंचितला प्रत्येकी 12 जागा मिळाल्या पाहीजेत असे म्हटले आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित बहूजन आघाडीला मिळालेल्या भरघोस मतांमुळे 7 ठिकाणी पराभव स्विकारावा लागला. या सात जागांमध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर अनेक दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे.वंचित बहूजन आघाडीला मिळालेल्या या भाजपविरोधी मतांचा मोठा फटका महाविकास आघाडीला मिळाला.
त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी धोरणात्मक युतीवर जोर देत शिवसेना (ठाकरे गट) बरोबर युती केली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडीबरोबरच्या युतीची घोषणा करून मुंबई महापालिकेसाठी एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा इंडिया आघाडीमध्ये सहभाग करण्याची शिफारस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली असली तरी इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून आंबेडकरांच्या नावाला अजूनही दुजोरा मिळालेला नाही.
वंचित बहूजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आंबेडकरांनी गेल्या पाच वर्षांत पक्षाच्या वाढलेल्या ताकदीवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील फुटीमुळे त्यांचा जनमानसातील प्रभाव कमी झाला असल्याने महाविकास आघाडीसोबत युती करून 12 लोकसभेच्या जागा वंचितला मिळाल्याच पाहीजेत असा विश्वास व्यक्त केला.