वटपौर्णिमेनिमित्त सुवासिनींनी घातले वडाला साकडे
खानापूर : खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात सुवासिनीनी वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून झाडाला सुत बांधून फेरे घालत साकडेही घातले. त्यामुळे दिवसभर वडाच्या झाडाच्या परिसरात सुवासिनींची मोठी गर्दी दिसून येत होती. मंगळवारी सकाळपासूनच खानापूर शहरातील महिला पुजेचे साहित्य घेऊन स्टेशनरोडवरील सती माता मंदिराच्या आवारातील वडाच्या झाडाचे पूजन करत होते. दिवसभर सुवासिनींची गर्दी होती. पावसाने उघडीप दिल्याने सुवासिनीनी वडाच्या पूजेबरोबरच शहरातील मंदिरांच्याही भेटी घेऊन देवाचे दर्शन घेतले. तसेच मऱ्याम्मा देवीची यात्रा असल्याने महिलांनी यात्रेच्या ठिकाणीही जावून दर्शन घेऊन ओटी भरली. मऱ्याम्मा मंदिराजवळ दर्शनासाठी एकच गर्दी झाली होती. मंगळवारी ओटी भरणी कार्यक्रम पार पडला. बुधवारी नवसफेडणी होऊन जत्रेची सांगता होईल.
करंबळ येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी
खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात गावोगावी वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. पौर्णिमा असल्याने सकाळपासूनच महिलांच्यामध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. भरजरी वस्त्रs, अलंकार घालून महिला गटागटाने जवळच्या वडाच्या झाडाजवळ येत होत्या. वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर सुवासिनींनी झाडाभोवती दोरा गुंडाळून हाच पती सात जन्मी मिळू देत म्हणून मनोभावे पूजा केली.