Vat Purnima 2025 Special: खंबीर सावित्री, आपत्तीचा दोष नशिबाला नाही, पतीच्या निधनानंतर सांभाळलं घर!
पोलिसाची ड्युटी घड्याळाच्या काट्याकडे बघत करायचीच नसते.
कोल्हापूर : कोरोनाचा काळ. त्या काळात साथीने थैमान घातलेले. कोरोनाची कधी आपत्ती येईल याची कोणालाही खात्री नव्हती. मी पोलीस दलात. पोलीस म्हणजे अत्यावश्यक सेवा. त्यामुळे मी ड्युटीवर रोज देवाकडे प्रार्थना करायची. देवा सर्वांना आधार दे म्हणायची. पण माझे पती श्रीकृष्ण यांना कोरोनाने गाठले.
आमच्या परीने आम्ही खूप प्रयत्न केले. मी सावित्री होऊन पतीसाठी प्रार्थना करत राहिले. पण नको तो क्षण वाट्याला आलाच. अशा आठवणी करवीर पोलीस ठाण्याच्या हवालदार अश्विनी श्रीकृष्ण मोरे यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना सांगितल्या.
श्रीकृष्ण मोरे हे कोरोनाचे बळी ठरले. मी या घटनेने हबकलेच. साऱ्या जगावर आलेल्या आपत्तीचा झटका आमच्या कुटुंबाला बसला. पण मी नशिबाला देवाला दोष देत बसले नाही. मात्र मला पुढच्या आयुष्यात माझ्या सर्व कुटुंबीयांना घेऊन जगण्यासाठी बळ दे, अशा आशयाची प्रार्थना करत राहिली.
हळूहळू कोरोनाचा कहर ओसरला. आणि माझ्यापुढे मी, माझी दोन मुले, सासू-सासरे, दोन नणंदा, एक दिर अशा आठ जणांना घेऊन घर सांभाळायची जबाबदारी आली. त्यात मी पोलीस ड्युटीवर. आठ तासाची असली तरी आठ तास झाल्या क्षणी पोलीस ठाण्यातून बाहेर पडायला कधीच मिळत नव्हते.
कारण पोलिसाची ड्युटी घड्याळाच्या काट्याकडे बघत करायचीच नसते. याची जाणीव आम्हाला नोकरीवर रुजू होतानाच करून दिली जात असते. पण मी अशावेळी खचले नाही. माझ्यापेक्षा जादा काम करत आयुष्य काढणाऱ्या माणसांच्याकडे मी पाहत राहिले. व नवे आयुष्य सुरू केले. त्या सावित्रीने नवऱ्याचे प्राण परत आणले होते. पण मी माझ्या आठ जणांच्या कुटुंबाला स्थिरस्थावर करण्याचे खूप जोमाने प्रयत्न केले.
पोलीस खात्यातील माझ्या सहकाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे मला खूप सहकार्य मिळाले. मी तर पोलीस ठाण्याच्या कामात क्षणाचाही वेळ न घालवता पुन्हा स्वत:ला झोकून दिले. ठाणे अंमलदार म्हणून काम करताना समोर जो कोणी तक्रार घेऊन येईल त्याचे जे सांगेल ते ऐकून घेऊ लागले.
कारण पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांच्याकडून अगदी चांगल्या वागणुकीची नव्हे तर आपलं कोणतरी ऐकून घ्यावे एवढीच एक अपेक्षा असते. आता मी करवीर पोलीस ठाण्यात आहे. करवीर पोलीस ठाणे म्हणजे सर्वात मोठे पोलीस ठाणे. तेथे मी कार्यरत आहे. दैनंदिन सेवा बजावत मी माझे कुटुंब अगदी व्यवस्थित चालवत आहे.