For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vat Purnima 2025: नवऱ्याच्या कामाचा भार हलका करणाऱ्या कोल्हापूरच्या सावित्री!

02:02 PM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
vat purnima 2025  नवऱ्याच्या कामाचा भार हलका करणाऱ्या कोल्हापूरच्या सावित्री
Advertisement

या सावित्रींचा नवऱ्याच्या आरोग्यासाठी हातभार लागतो आहे

Advertisement

कोल्हापूर : या ताईंचा नवरा महापालिकेत स्वच्छता सफाईला आहे. रोज पहाटे उठायचं. हजेरी द्यायची म्हणजेच पंचिंग करायचं. त्यानंतर कामावर जायचं. दुपारपर्यंत काम करायचे. शिवाय काही वेगळी स्वच्छता मोहीम सुरू झाली तर त्यातही काम करायचे. ते रोज याच कामात. त्यामुळे नवऱ्याच्या प्रकृतीला त्रास सुरू झाला, पण रजा किती वेळा मिळणार? यातून त्याच्या बायकोनेच म्हणजे सावित्रीने मार्ग काढला.

रोज पहाटे तीच नवऱ्यासोबत रस्ते स्वच्छतेच्या कामात मदत म्हणून येऊ लागली आणि नवऱ्याच्या कामाचे ओझे अंगावर घेऊ लागली. त्या पुराणातल्या सावित्रीने पतीचे प्राण परत आणले. पण या सावित्रीने नवऱ्यावरील कामाचा भार अंगावर घेऊन त्याचे आरोग्य जपले. महापालिकेत अशा एक नवे दोन नव्हे, 25 ते 30 सावित्री आहेत. त्यांनी नवऱ्याच्या हातातला झाडू आपल्या हातात घेतला आहे आणि पतीचे आरोग्य जपायचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

म्हटलं तर हे नियमात बसत नाही. पण अशा सावित्री महापालिकेच्या मस्टरवरही नाहीत, पण त्यांच्यामुळे रस्ता स्वच्छ होतो आहे. त्यांच्या नवऱ्याच्या आरोग्यासाठी हातभार लागतो आहे. नवऱ्याला नेमून दिलेले कामही पूर्ण होत आहे. सर्वच सफाई कामगार रोज कचरा, घाणीच्या सानिध्यात, त्यामुळे सुरुवातीच्या काळात नाही. पण काही वर्षानंतर या कामामुळे त्यांना कोणता ना कोणता शरीराचा विकार जडतो.

खोकला, त्वचारोग, संधिवात, पार्शली पॅरालिसीस हे आजार येऊन भिडतातच. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर नक्की होतो. निवृत्तीचे वय 8 ते 10 वर्षे राहिलेल्या कर्मचाऱ्यांत हा त्रास नक्की येऊन भिडतोच आणि या आजारात आरोग्य तपासणी झाली तर तो कर्मचारी आरोग्याच्या निकषावर अपात्र ठरू शकतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या मदतीला त्यांची पत्नी त्या क्षणी धावून येते.

कारण पती-अपात्र ठरून घरात बसला तर कुटुंब कसे जगवायचे, हा गंभीर प्रश्न थेट तिलाच येऊन भिडत असतो. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांच्या मदतीला त्यांची पत्नी सावित्री बनून येते. ती नवऱ्याच्या हातातील झाडू हाती घेते. पहाटे नवऱ्यासोबत कामावर येते. नियमाने हजेरीचे पंचिंग नवरा करतो आणि पत्नीच्या हातातील झाडू स्वच्छतेचे काम करू लागतो. नवराही थोडीफार मदत करतो. पण पत्नी स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारते आणि नवऱ्याच्या कष्टाचा भार उचलते.

महापालिका असा प्रकार तात्काळ बंद करू शकते. पण गेली कित्येक वर्षे नवऱ्याच्या मदतीला त्याची बायको, हा प्रकार सुरू आहे. त्या सावित्रीने पतीचे प्राण परत आणले, पण येथे या सावित्रीने पतीच्या कामाचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे आणि आजारी नवऱ्याला होणारा कामाचा त्रास नक्कीच कमी केला आहे, ही परिस्थिती प्रशासनाला समजते. पण ते सहानुभूती दाखवतात.

रस्ता, गटर स्वच्छ होते की नाही, एवढेच बघतात आणि त्या नवरा बायकोंना अप्रत्यक्ष मदत करतात. नवऱ्याच्या कामाच्या ठिकाणी रोज पहाटे नवऱ्यासोबत जाऊन स्वच्छता करणाऱ्या या भगिनी आधुनिक सावित्रींची रोज भूमिका बजावतात.

Advertisement
Tags :

.