शहर परिसरात वटपौर्णिमेचे श्रद्धेने आचरण
बेळगाव : अखंड सौभाग्यासाठी शहर परिसरातील महिलांनी मंगळवारी वटपौर्णिमेचे व्रत मोठ्या श्रद्धेने आचरले. सावित्रीने यमापासून सत्यवानाचे प्राण परत मिळविले आणि आपले सौभाग्य चिरंतन राखले, अशी पुराणकालीन कथा आहे. तेव्हापासून महिला अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत श्रद्धेने करतात. यानिमित्त बाजारपेठेमध्ये पूजेसाठी लागणारे साहित्य गेल्या दोन दिवसांपासूनच उपलब्ध झाले होते. मणिमंगळसूत्र, हळदी-कुंकू, जोडवी, फणी, धागा अशा सौभाग्यवानांचा द्रोण 30 ते 40 रुपयांना विकला जात होता. वटसावित्रीच्या पूजेचा पट, वडाची फांदी यांचीही विक्री झाली. या दिवशी महिला फळांनी ओटी भरतात. त्यामुळे बाजारपेठेत फणसाचे गरे, आंबे, जांभळं, धामणं, केळी यांचीही विक्री तेजीत झाली. सकाळपासूनच घरातील पूजा करून महिलांनी शहर परिसरात असणाऱ्या वटवृक्षाची पूजा केली. जन्मोजन्मी हाच पती लाभावा, या भावनेने वडाला धागे गुंडाळले. त्यानंतर परस्परांना हळदी-कुंकू देऊन ओटी भरण्यात आली. शहर परिसरात कपिलेश्वर मंदिर, व्हॅक्सिन डेपो, समादेवी गल्ली, रिसालदार गल्ली, अनगोळ, आझमनगर, वडगाव व उपनगरांतील वटवृक्षांपाशी महिलांची गर्दी होती.