वसुंधरा चित्रपट महोत्सव 21 पासून
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ पर्यावरणशास्त्र विभाग व किर्लोस्कर उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मंगळवार, 21 रोजी पासून सुरूवात होणार आहे, अशी माहिती पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. आसावरी जाधव, सीएसआर प्रमुख शरद आजगेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 23 जानेवारीपर्यंत शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात या महोत्सवाचे आयोजन केले असुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जागृतीसह पर्यावरणाच्या स्थानिक प्रश्नांना हाताळण्यासाठी महोत्सवाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. जाधव म्हणाल्या, ‘सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ हे फेस्टिवलमधील प्रमुख विषय आहेत. 21 रोजी सकाळी 10.30 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. 50 हून अधिक लघपुट दाखवण्यात येणार असून सर्वांसाठी मोफत प्रवेश आहे. सकाळी 11 सायंकाळी 5:30 या वेळात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
आजगेकर म्हणाले, चित्रपटांसोबतच महोत्सवामध्ये विविध विषयांवर चर्चासत्रे, क्षेत्र भेटी, फोटोग्राफी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विद्यापीठातील निसर्ग, शहरी पर्यावरणीय समस्या, पश्चिम घाट आणि शहरातील वन्यजीव विषयांवर फोटो व रिल्स स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगितले. यावेळी डॉ. रसिया पडळकर, किर्लोस्करतर्फे एचआर हेड हरीश सैवे, सिनिअर जनरल मॅनेजर व्ही. एम. देशपांडे, मोहन तायडे उपस्थित होते.
- वसुंधरा पुरस्कार असे
- वसुंधरा सन्मान : डॉ. एस. आर. यादव
- वसुंधरा गौरव : डॉ. अनिलराज जगदाळे
- वसुंधरा मित्र : प्रा. नागेश दप्तरदार
- वसुंधरा मित्र : अमोल बुढे
- वसुंधरा मित्र : संपूर्ण अर्थ लाईव्हलीहूड फाउंडेशन
- महोत्सवातील कार्यक्रम असे
21 रोजी दुपारच्या सत्रात ‘कचरा व्यवस्थापन‘ या विषयावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. सायंकाळी 6 वाजता ‘निसर्गायन’ या निसर्गविषयक कविता व गाण्यांचा कार्यक्रम सादर होईल. 22 रोजी दुपारच्या सत्रात ‘साकारु शाश्वत शहरे‘ या विषयावर चर्चासत्र. सायंकाळी 6 वाजता ‘स्टेंड अप कॉमेडीचे‘ आयोजन केलेले आहे. 23 रोजी सकाळी 8 वाजता विद्यापीठातील बोटॅनिकल गार्डन येथे अभ्यास भेटीचे आयोजन. दुपारी 3 वाजता किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कारांचे वितरण होणार आहे.