माजगाव येथील वासुदेव कानसे यांचे निधन
सहकार क्षेत्रात पाच दशके महत्त्वपूर्ण योगदान
ओटवणे प्रतिनिधी
सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले माजगाव येथील वासुदेव ऊर्फ भाऊ नारायण कानसे (९२) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते असलेले वासुदेव कानसे माजी मंत्री कै भाईसाहेब सावंत यांचे विश्वासू सहकारी होते .मात्र आताच्या राजकारणापासून ते अलिप्त होते.
लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना निस्वार्थी भावनेने विविध शासकीय योजनांचा लाभ गोरगरिबांना मिळवून दिला. सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देताना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक पद भूषविले. तसेच माजगाव सोसायटीचेही ते ४० वर्षे चेअरमन होते. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ तसेच सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीचेही ते चेअरमन होते. सावंतवाडी अर्बन बँकेचे ते संचालक होते.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत कानसे कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निवृत्त कर्मचारी नारायण उर्फ बबन कानसे आणि रवींद्र कानसे, निवृत्त प्राथमिक शिक्षिका किरण कानसे उर्फ स्मिता सुहास सावंत, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या मुख्य लिपिक संगिता कानसे उर्फ वैष्णवी विजय सावंत यांचे ते वडील तर माजगाव माजी उपसरपंच तथा सदस्य संजय कानसे, माजगाव हायस्कूलचे निवृत्त कर्मचारी प्रभाकर कानसे, पुरुषोत्तम कानसे यांचे ते काका होत.