विशाल की चंद्रहार ठरेना ! सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू
काँग्रेस कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका : ठाकरे गटाकडून चंद्रहार सांगलीसाठी इच्छुक
सांगली प्रतिनिधी
कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज लढवणार आणि त्यांच्या प्रचारात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उतरणार हे स्पष्ट झाले असले तरी महाराज हाताच्या की मशालीच्या चिन्हावर लढणार हे स्पष्ट होत नसल्याने सांगली लोकसभेचा निर्णयही अधांतरी राहिला आहे. महा†वकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार वशाल पाटील की चंद्रहार पाटील हे ठरणे मुश्किल झाले आहे. दरम्यान विशाल पाटील हे भाजपात जाणार आहेत अशा वावड्या उठल्या असून त्याचा ा†वशाल पाटील यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे.
सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते विशाल पाटील की शिवसेनेकडून चंद्रहार पाटील उमेदवार असतील याच्याच चर्चा दिवसभर रंगल्या आहेत. त्यातच विशाल पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेला उधाण आले. पण विशाल पाटील यांनी या सर्व वावड्या आहेत, मी फक्त आणि फक्त काँग्रेसकडूनच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सांगलीची जागा कोणाकडे हेच महत्वाचे ठरणार
सांगली लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पण 2019 साली काँग्रेसकडून हा मतदारसंघ राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात आला. त्यामुळे ऐनवेळी राजू शेट्टी यांच्या सांगण्यावरून विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या बॅट या चिन्हावर निवडणूक लढावी लागली. आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उध्दव ठाकरे शिवसेना या पक्षाचा समावेश आहे. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार हे गेल्या वर्षापासून सांगितले जात आहे. पण ऐनवेळी मात्र महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना रिंगणात उतरवण्याचा निर्धार केला. त्यामुळे शाहू महाराजांनी शिवसेनेपेक्षा कॉंग्रेसकडूनच आपण लढणार असल्याचे सांगितले. माजी मंत्री सतेज पाटील त्यासाठी आग्रही असून हा मतदारसंघ काँग्रेसला सुटलाच असे कोल्हापुरात वातावरण आहे. पण, गतवेळी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने खासदार निवडून आणले असल्यामुळे कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेना ठाकर गटाने मागितली आहे. त्यातच या जागेचा घोळ सुरू झाला आहे.
दरम्यान सांगली जिल्हा काँग्रेसने याला जोरदार विरोध केला आहे. जर काँग्रेसने ही जागा मित्र पक्षास सोडल्यास जिह्यातील पक्ष विसर्जित करण्याची धमकी नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे याचा विचार काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी निश्चित करणार आहे. सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली तर ते तिकिट वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनाच मिळणार आहे. तर चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर धडक मारत उध्दव ठाकरे यांची भेट घेवून आपण शिवसेनेच्या मशाल चिन्हावर सांगलीत लढण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता चंद्रहार पाटील हेही महाविकास आघाडीच्या घटक पक्षात येवून उमेदवारीचा दावा ठोकत आहेत. त्यामुळे ही जागा जर ठाकरेंकडे गेली तर चंद्रहार पाटील त्यांचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये काय ठरते यावर सांगलीचा निर्णय ठरणार आहे.
विशाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या वावड्या
दरम्यान या उमेदवारीचा घोळ सुरू असतानाच विशाल पाटील हे भाजपाच्या संपर्कात असल्याच्या वावड्या मिडियामधून उठल्या गेल्या आहेत. त्यावर विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. आपण वसंतदादांचे नातू आहोत आणि काँग्रेस पक्षाकडून मी इच्छुक उमेदवार आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या उमेदवारीला आणि सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार असा विश्वास दिला आहे. जिह्याचे नेते विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिह्यात काँग्रेसची कार्यकारिणी आपल्या पाठीशी असताना भाजपा प्रवेशाची वावडी काही मिडीयातून उठवण्यात आली आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे मी काँग्रेसकडूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले.
शेट्टींचा हट्ट सेनेने न मानल्यास पेच सुटणार
सांगली आणि कोल्हापूर दोन्ही काँग्रेससाठी सोडायचा तर ठाकरेंच्या सेनेला राजू शेट्टी यांचा आघाडीत न येता पाठींबा देण्याचा हट्ट नाकारून हातकणंगले लढवावा लागेल. त्याद्वारे पेच सुटू शकतो. मात्र सेना नेतृत्व त्याला तयार नाही. काँग्रेसने सांगली सोडावा आमच्याकडे आता उमेदवार आहे, अशी ठाकरेंची भुमिका असल्याचे समजते.