वास्कोची साध्वी सैल बनली ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’
ओडिशात अंतिम फेरीत झाली निवड : गोव्याचे केले होते प्रतिनिधीत्व : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले अभिनंदन : गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला
काणकोण : मूळ सदाशिवगड, कारवार येथील आणि सध्या वास्को येथे स्थायिक झालेल्या साध्वी सतीश सैल या युवतीची 61 वी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 म्हणून निवड झाली आहे. साध्वी सैल ही कारवारचे काँग्रेसचे आमदार सतीश सैल यांची सुकन्या असून तिचे बालपण वास्को शहरात गेले आहे व तेथेच तिने शिक्षण घेतलेले आहे. फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने गोवा राज्याचे प्रतिनिधीत्व केले होते. या स्पर्धेत पहिली उपविजेती महाराष्ट्राची राजनंदिनी पवार ठरली, तर द्वितीय उपविजेती होण्याचा मान जम्मू-काश्मीरच्या अद्वैता हिला मिळाला आहे. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांच्या सौंदर्यवतींनी भाग घेतला होता.
गोव्याचे नाव उंचावले : मुख्यमंत्री
साध्वीने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने गोव्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. तिचा हा प्रवास गोव्यातील अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिचे अभिनंदन केले आहे. गोव्यातून या स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्यात ती एकमेव स्पर्धक होती. प्राथमिक फेरीसाठी संपूर्ण देशातील 30 राज्यांतील 600 स्पर्धक सहभागी झाले होते, तर अंतिम फेरी भुवनेश्वर, ओरिसा येथे झाली. साध्वी हिला एकूण 7 भाषा अवगत असून मनमिळावू आणि मितभाषी असलेल्या साध्वी हिचे कारवार तसेच गोवा प्रांतातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सदाशिवगड येथे आल्यावेळी आपला बहुतेक वेळ ती कारवारच्या आशा निकेतन या मूकबधिर मुलांसाठी असलेल्या शाळेत घालवत असते. प्रतिष्ठेचा मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर साध्वी आता जागतिक स्तरावरील ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करणार आहे. जागतिक मंचावर भारताची मान उंचावण्यासाठी ती आता सज्ज झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोव्याला ‘मिस इंडिया’चा किताब मिळाला आहे. साध्वी सैलच्या या यशामुळे गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे संपूर्ण गोव्यातून तसेच तिचे मूळ गाव सदाशिवगड कारवार या भागातून तिला सर्व स्तरातून नागरिकांच्या शुभेच्छा मिळत आहेत.
7 भाषांमध्ये पारंगत
साध्वी सैल ही 7 वेगवेगळ्या भाषांमध्ये पारंगत आहे. साध्वीने कॅनडाच्या एका विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ‘डबल मेजर’ पेले आहे. मिस वर्ल्ड इंडियामध्ये सामील होण्यापूर्वी ती अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये सामील झाली होती. तसेच अनेक दिग्गज ब्रँडसाठी तिने कॅम्पेनही केले होते.