वास्को दरोड्याचा पर्दाफाश, सहाजणांना अटक
लुटलेला सर्व ऐवजही हस्तगत : सर्व दरोडेखोर ओडिशातील,आज सकाळी आणणार गोव्यात,अखेर गोवा पोलिसांचे मोठे यश
वास्को : वास्को बायणातील चामुंडी आर्केड इमारतीतील फ्लॅटवरील दरोडा प्रकरणाचा पूर्ण पर्दाफाश करण्यास अखेर पोलिसांना यश आले. या दरोड्यातील सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून लुटीचा सर्व ऐवजही हस्तगत करण्यात आलेला आहे. सातव्या दरोडेखोरालाही गजाआड करण्यात यश येईल, असे मुरगावचे पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी सांगितले. बायणातील सागर नायक यांच्या फ्लॅटवरील हे दरोडाप्रकरण गेले आठ दिवस बरेच गाजले. आठ दिवस झाले तरी दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांना टीकेला सामोरे जावे लागले होते. पोलिसांवरील दबाव प्रचंड वाढला होता. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वप्रथम दरोडेखोरांना अटक करण्यास यश आल्याची बातमी दिली.
दरोडेखोरीचा पर्दाफाश करण्यात यश आल्याने बुधवारी सकाळी मुरगावचे निरीक्षक शेरीफ जॅकीस यांनी या दरोड्यात जखमी झालेले सागर नायक यांची भेट घेतली आणि दरोडेखोरांना अटक करण्यात यश आल्याची माहिती त्यांना दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना पोलिसांनी दिवसरात्र कठोर परिश्रम करून दरोडेखोरांचा छडा लावलेला आहे. पोलिसांची विविध पथके ओडिशा आणि महाराष्ट्रात पाठवण्यात आली होती. त्यांनी त्या ठिकाणी काही दिवस तळ ठोकला होता. अखेर कष्टांना यश आले. आयजी, डिआयजी, डीजीपी, एसपी, डिव्हायएसपी अशा अधिकाऱ्यांनीही या दरोड्याचा छडा लावण्यासाठी कष्ट घेतल्याचे ते म्हणाले.
सविस्तर माहिती देण्यास नकार
या दरोड्याचा तपास अजून सुरू आहे. आतापर्यंत सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांनी लुटलेला लाखोंचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. सातव्या आरोपीचाही शोध घेण्यात येत असून तो लवकरच हाती लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, अटक करण्यात आलेले दरोडेखोर आणि त्यांच्या दरोडेखोरीबद्दल अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले.
दरोडेखोरांना आज आणणार गोव्यात
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या सहा दरोडेखोरांपैकी काहींना ओडिशामध्ये तर काहींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. ते सर्वजण ओडिशा राज्यातील आहेत. त्यांना गोव्यात आणल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांना रस्तामार्गे आज गुरूवारी सकाळपर्यंत गोव्यात आणण्यात येणार आहे. पोलिसांनी आठ दिवसांत दरोडेखोरांचा छडा लावल्याने सागर नायक व कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे.
दरोड्यात लुटला होता 35 लाखाचा ऐवज
बायणातील चामुंडी आर्केड इमारतीतील सहाव्या मजल्यावरील नायक कुटुंबाच्या फ्लॅटला दरोडेखोरांनी लक्ष्य केले होते. त्यांनी किचनच्या खिडकीतून त्यांच्या घरात पहाटे अडिचच्या सुमारास प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी बेडरूम फोडून नायक कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला. घरमालक सागर नायक यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले होते. त्यानंतर या कुटुंबाला बांधून घालून व तोंडात बोळा कोंबून त्यांची तिजोरी लुटली होती. तसेच त्यांची कार घेऊन पसार होण्याचा बेत फसल्याने हे दरोडेखोर या इमारतीच्या ज्या मागच्या बाजुने आले होते, त्याच मार्गाने पसार झाले होते. या दरोड्यात 35 लाख रूपये किमतीचा ऐवज दरोडेखोरांनी लुटल्याचे सागर नायक यांच्या पत्नी हर्षा नायक यांनी तक्रारीत म्हटले होते.
गाडा चालवणाऱ्या ओडिशातील युवकावर संशय
या दरोड्यामागे नायक कुटुंबाच्या ओळखीच्या असलेल्या युवकाचा हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा युवक ओडिशा राज्यातील असून बायणातील चांमुंडी आर्केड इमारतीसमोरील नायक कुटुंबाच्या मालकीचाच गाडा तो चालवीत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने गाडा चालवणे बंद करून तो आपल्या गावी गेला होता. त्याच्या ओळखीचे ओडिशातील काही युवकही तो असताना येऊन गेले होते. दरोडा प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी ओडिशाचेच असल्याने त्या युवकाबाबत संशय बळावलेला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. पुढील तपासात या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो.