वास्को मार्केट आग दुर्घटनेतील व्यापाऱ्यांना 1.39 कोटींची मदत; 103 व्यापाऱ्यांचे 145 अर्ज; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकसानभरपाईचे धनादेश वितरित
या दुर्घटनेत नुकसान झालेल्या 103 व्यापाऱ्यांकडून नुकसानभरपाईसाठी 145 अर्ज दाखल झाले होते. आगीच्या घटनेनंतर अवघ्या पाच दिवसांत सरकारने मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांच्या दुःखात सरकार सहभागी असून त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू होईपर्यंत सरकार त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मॉडर्न मार्केटच्या जागेवर तात्पुरती शेड
आगीत जळालेल्या मॉडर्न मार्केटच्या इमारतीला कोसळण्याचा धोका असल्याने त्या इमारतीत किंवा तिच्या खाली पुन्हा व्यवसाय सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे इमारतीच्या जागेवर तात्पुरती शेड उभारून सर्व व्यापाऱ्यांची व्यवस्था करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सर्व व्यापाऱ्यांचे व्यवसाय महिनाभरात पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त करताना व्यवसाय सुरू होण्याच्या आठ दिवस आधी दुसऱ्या टप्प्यातील आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यानंतर उद्घाटनासाठी आपण पुन्हा उपस्थित राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
धोकादायक इमारती पाडण्याची मागणी
यावेळी आमदार दाजी साळकर आणि आमदार संकल्प आमोणकर यांनी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना व्यवसाय पूर्ववत होईपर्यंत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. वास्को शहरात भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी धोकादायक इमारती पाडण्याकरिता त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी आमदार दाजी साळकर यांनी जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांच्याकडे केली.
कार्यक्रमाला आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, मुरगाव पालिका प्रशासक जयंत तारी, मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक, दीपक नाईक, उपजिल्हाधिकारी प्रतापराव गांवकर, मामलेदार प्रचिणाज्य पंडित तसेच अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.
