वास्को मार्केट आग : अग्निसुरक्षेचा अभाव आणि निकामी हायड्रंटमुळे अडचणी; अग्निशमन दलाचे स्पष्टीकरण
आगीची घटना दुर्दैवी असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. आग लागल्याची माहिती मिळताच अवघ्या चार मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. नऊ सरकारी अग्निशमन बंबांसह अन्य पाच बंबांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अनेक फेऱ्या मारून आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे जवळपास 500 दुकाने वाचविण्यात यश आले, असा दावाही बिचोलकर यांनी केला.
व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पुरेशा अग्निसुरक्षा उपाययोजना नव्हत्या. प्लास्टिक आणि पॉलिथीनच्या आवरणांचा वापर तसेच मोठ्या प्रमाणातील कचऱ्यामुळे आग पसरण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. पालिकेने उभारलेली हायड्रंट यंत्रणाही निकामी ठरल्याने अग्निशमन दलाला अडचणींचा सामना करावा लागला. ही यंत्रणा कार्यरत असती तर आणखी काही प्रमाणात नुकसान टाळता आले असते, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आगीतील नुकसानभरपाईसाठी रविवारी रात्रीपर्यंत 150 व्यापाऱ्यांनी दावे दाखल केले आहेत. वास्को नगरपालिका सभागृहात छाननी समिती, अधिकारी आणि कर्मचारी या प्रक्रियेसाठी उपस्थित होते.
दरम्यान, समाजसेवक तथा चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी आगीत जळालेल्या मार्केटमधील शेड व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी पुन्हा उभारून देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपालिकेकडे लेखी परवानगी मागितली आहे.
मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही रविवारी संध्याकाळी आगग्रस्त व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मगो पक्षातर्फे व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देत या कठीण काळात पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी प्रताप फडते आणि बाबू नाणोरकर उपस्थित होते.
