For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

वास्को आग दुर्घटना : 119 व्यापाऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी दिली माहिती; महिनाभरात पुनर्वसनासाठी सरकार सरसावले

01:26 PM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
वास्को आग दुर्घटना   119 व्यापाऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी दिली माहिती  महिनाभरात पुनर्वसनासाठी सरकार सरसावले
Advertisement
वास्को : वास्को येथील मॉर्डन मार्केट आणि संडे मार्केटमधील भीषण आग दुर्घटनेनंतर नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. नुकसानभरपाई आणि व्यवसायाचे पुनर्वसन या दोन्ही प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आतापर्यंत 119 व्यापाऱ्यांनी छाननी समितीकडे नुकसानीची माहिती सादर केली आहे. रविवारीही ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.

नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर यांच्या नेतृत्वाखाली छाननी समिती नियुक्त केली आहे. या समितीत मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समितीकडून व्यापाऱ्यांच्या नुकसानीची माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांची छाननी केली जात आहे.

Advertisement

मुरगाव पालिकेकडे संडे मार्केट आणि मॉर्डन मार्केटमधील एकूण 149 व्यापाऱ्यांची नोंद आहे. त्यापैकी 133 फिरते विक्रेते, तर 16 दुकानमालक आहेत. आतापर्यंत 119 व्यापाऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी माहिती दिली आहे. अनेक व्यापाऱ्यांचे मालमत्तेसंबंधीचे पुरावे आगीत जळून नष्ट झाल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा व्यापाऱ्यांना आवश्यक पुरावे सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुदत दिली आहे.

या दुर्घटनेत एका चप्पल विक्रेत्याने तब्बल 65 लाख रुपयांच्या नुकसानीचा दावा केला असून, अन्य एका व्यापाऱ्याने 50 लाख रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Advertisement

दरम्यान, आमदार दाजी साळकर यांनी 1 नोव्हेंबरपासून त्याच जागी व्यापाऱ्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याच्या कामाला प्रारंभ करण्याचे आश्वासन सरकारतर्फे दिले आहे. दिवाळीचा सण आग दुर्घटनेमुळे अडचणीत गेला असला, तरी नाताळ आणि नववर्षापूर्वी व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, आगीत नुकसान झालेल्या मॉर्डन मार्केट इमारतीचे गोवा राज्य शहर विकास प्राधिकरणाकडून (जीसुडा) सर्वेक्षण करण्यात आले आहे. ही इमारत पुन्हा वापरण्यास सुरक्षित आहे की नाही, याबाबत अहवाल तयार केला जाणार आहे. अहवालानंतरच इमारतीच्या वापराबाबत निर्णय घेतला जाईल. इमारत असुरक्षित ठरल्यास संबंधित व्यापाऱ्यांच्या पर्यायी पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

या कठीण परिस्थितीत एम. एस. लोटलीकर ज्युवेलर्सतर्फे नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Tags :

.