वास्कोला पावसाने झोडपले आजपासून राज्यात मुसळधार
पणजी : गेल्या 24 तासात वास्कोला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. आजपासून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून ऑरेंज अलर्ट तीन दिवसांकरिता जारी केला आहे. रविवारी रात्री उशिरा पावसाने वास्कोला झोडपले. वास्कोमध्ये जवळपास तीन इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. दाबोळीमध्ये दीड इंच पाऊस झाला, तर सांगेमध्ये एक इंच पावसाची नोंद झाली. मान्सूनपूर्व पावसामध्ये यंदा वास्कोमध्ये पावसाची सर्वाधिक मोठी नोंद झाली आहे. हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या माहितीनुसार उद्या 21 मे रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा व त्याचे वादळात रूपांतर होऊ शकते आणि हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकणार आहे.
गोव्यात मान्सून नियमितवेळी येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सध्या अंदमान निकोबारपासून बंगालच्या खाडीमध्ये मान्सून सक्रिय झालेला आहे. उद्या तो आणखी पुढे सरकणार असून तो तामिळनाडूच्या किनारपट्टी तसेच अरबी समुद्रात आणि तिथून केरळमध्ये पोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्नाटक व गोवा असा मान्सूनचा प्रवास असून सध्याचा वेग पाहता तो नियमित वेळेत गोव्यात येऊ शकतो, असा अंदाज आहे. दरम्यान आजपासून हवामान खात्याने गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याची तीव्रता वाढली जाणार असल्याने तयारीनिशी रहा हे सांगण्याकरिता नारंगी अलर्ट जारी केले आहे. उद्या आणि परवादेखील नारंगी अलर्ट जारी केले असून त्या पुढील दिवशी येलो अलर्ट जारी केले आहे. या दरम्यानच्या काळात पावसाचा वेग त्याचबरोबर वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.