वास्कोतील आग दुर्घटनेचा अपराधी कोण? अनेक गंभीर प्रश्न चव्हाट्यावर
वास्को: वास्कोतील आग दुर्घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ही आग दुर्घटना अपघात की घातपात हा पहिला प्रश्न उपस्थित झालेला असून दुसरा प्रश्न मार्केटच्या सुरक्षेकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षतेचा आहे. तिसरा प्रश्न आगीच्या घटनेत बचाव कार्यात कमी पडलेली शासकीय यंत्रणा हा आहे. हा प्रश्न गोव्यातील राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनीही अत्यंत गंभीरपणे मांडलेला आहे. वास्कोत घडलेल्या दुर्घटनेचा अपराधी कोण हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
बुधवारी मध्यरात्री वास्कोतील मॉडर्न मार्केट आणि संडे मार्केट तासाभरातच जळून खाक झाले. अग्निशामक दलांनी अथक प्रयत्नांअंती आग नियंत्रणात आणली व मार्केटबाहेर लोळ पसरण्यापासून बचाव केला. मात्र, मॉर्डन मार्केट आणि संडे मार्केट वाचवता आले नाही. घटनास्थळी शासकीय आणि औद्योगिक आस्थापनांचे अग्निशामक बंद दाखल झाले. एकूण वीस बंबांनी हे बचाव कार्य केले. मात्र, बचाव कार्य कमकुवत असल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी त्याच ठिकाणी यंत्रणेविरुद्ध गोंधळ घालायला सुरुवात केली. त्या रात्री व्यापाऱ्यांनी शासकीय यंत्रणेवर अकार्यक्षमतेचे आरोप केले. नौदलाचा बंब दाखल झाला नसता तर दुर्घटनेची व्याप्ती अधिक वाढली असती, असेही मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. दुकाने जळत असताना उघड्या डोळ्यांनी पाहावी लागली, तरी व्यापारी काहीही करु शकले नाहीत. अन् बचाव कार्य करणारेही काही करु शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनीही बचाव कार्यातील उणिवांवर बोट ठेवून सरकारी यंत्रणेला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
दुर्घटनास्थळी त्या रात्री दिसून आलेल्या बचाव कार्यातील उणिवांचा प्रश्न काल तिसऱ्या दिवशी विरळ झालेल्याचे दिसून आले. मात्र, सदर दुर्घटना अपघात की घातपात हा विषय चर्चेचा ठरलेला आहे. बहुतेक लोक घातपाताचा संशय व्यक्त करीत आहेत. आग कशी व कुठून लागली, ती लागली की लावली गेली याचा तपास पोलिस करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध दुकांनांना आग लावल्याचा गुन्हा नोंद केला आहे. या संशयास्पद प्रश्नाबरोबरच वास्कोत सदर मार्केटच्या संवेदनशील व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थितीत करण्यात येत आहेत. वास्को शहरातील नगरपालिका मार्केटमध्ये सुद्धा थोड्या फार फरकाने अशीच परिस्थिती असल्याने आता कधी तरी हे मार्केटही पेट घेण्याचा धोका व्यक्त होऊ लागला आहे. नगरपालिका मार्केटमध्ये यापूर्वी काही आगीच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु अशा दुर्घटनांना तोंड द्यायला सक्षम यंत्रणा उपलब्ध नसल्याने चिंता ऐरणीवर आलेली आहे. नगरपालिका मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारकडे चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.
शहरातील संडे मार्केट व त्यालाच जोडून असलेले मॉर्डन मार्केट आगीसारख्या घटनांसाठी संवेदनशील असल्याचे यापूर्वीच्या आगीच्या घटनांमुळे उघडकीस आलेच होते. नगरपालिका मार्केटला रात्रीच्या वेळी खासगी सुरक्षा रक्षक असतो. प्रत्येक गेटला टाळे लावले जाते. सध्या भस्मसात झालेल्या मार्केटला मात्र कोणतीही सुरक्षा नव्हती. त्यामुळे कोणतीही चुक, आगळीक किंवा घातपातसारख्या घटना घडणे सहज शक्य आहे. उपलब्ध माहितीनुसार, शहरातील संडे मार्केट म्हणून ओळखला जाणारा बाजार पाचशे चौरस मीटर जमिनीवर होता. या पाचशे चौरस मीटर जमिनीवर १२० कच्च्या स्वरुपाची दुकाने दाटीवाटीने आहेत. तर मॉर्डन मार्केट इमारतीच्या गच्चीवर शेडखाली २०० चौरस मीटरमध्ये एकूण ७२ दुकाने अगदी दाटीवाटीने थाटण्यात आली होती. त्यामुळेच हे मार्केट आग दुर्घटनांसाठी संवेदनशील होते. दुर्दैवी आग दुर्घटनेमुळे करोडोंचे नुकसान झाले. मात्र, या दुर्घटनेचा अपराधी कोण? पालिकेचा निष्काळजीपणा, सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष की व्यापाऱ्यांची बेपवाई हा प्रश्न अनुत्तरीत राहिलेला आहे.
नुकसानग्रस्तांची दामोदराकडे प्रार्थना
शुक्रवारी सकाळी नुकसानग्रस्त दुकानदारांनी शहरातील दामोदर मंदिरात एकत्र येऊन दुर्घटनेत मनुष्यहानी टळल्याबद्दल देवाचे आभार मानले व पुढे व्यापाऱ्यांच्या समृद्धीसाठी तसेच विघ्न टाळण्यासाठी देवाकडे एकमुखी प्रार्थना करण्यात आली. आमदार दाजी साळकर यांनी व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा व्यापार उभा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. व्यापार पुन्हा उभा करण्याच्या कामाला उद्या रविवारपासून सुरु करण्यात येणार असून डिसेंबरपासून व्यापारी पुन्हा आपला व्यवसाय सुरु करु लागतील, असे आमदार साळकर यांनी म्हटले आहे. या कामासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांचेही सहकार्य लामत असल्याचे ते म्हणाले.
आजपासून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची नोंद होणार
दरम्यान, आज शनिवारपासून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची माहिती नोंदवून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यांना आपल्या नुकसानीचा दावा करताना पुरावेही सादर करावे लागणार आहेत. जवळपास १५० व्यापारी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. या व्यापाऱ्यांची नोंद करण्यासाठी आज शनिवार व उद्या रविवारीही सुट्टीच्या दिवशी मामलेदार कार्यालयाचे कर्मचारी मुरगाव पालिका सभागृहात हजर राहणार आहेत.
