For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

वास्कोतील आगीत वीस कोटीच नुकसानविरोधी पक्षांच्या नेत्यांचा सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप; दुर्घटनास्तहली वादांमुळे तणाव

09:20 AM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
वास्कोतील आगीत वीस कोटीच नुकसानविरोधी पक्षांच्या नेत्यांचा सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप  दुर्घटनास्तहली वादांमुळे तणाव
Advertisement

वास्को: वास्को शहरातील नगरपालिकेच्या मॉर्डन मार्केट संकुलासह संडे मार्केटच्या आग दुर्घटनेत जवळपास वीस कोटींच्या नुकसानीचा अंदाज दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांनी व्यक्त केला आहे. पहाटे तीन वाजेपर्यंत अग्निशामक दलांनी आग आटोक्यात आणली. परंतु ही आग गुरुवारी सकाळपर्यंत धुमसत होती, विरोधी राजकीय पक्षाच्या विविध नेत्यांनी दुर्घटना स्थळाला भेट देत या घटनेला सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

वास्को शहरातील या भीषण आग दुर्घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झालेला नाही. पहाटे तीनपर्यंत अग्निशामक दलांनी आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु धूर सकाळीही धुमसत होता. या आग दुर्घटनेत नव्वदहून अधिक दुकाने भस्मसात झालेली आहेत. तसेच मॉर्डन मार्केट म्हणून ओळखली जाणारी मुरगाव पालिकेची एक मजली इमारतही या आगीमुळे निकामी ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेतील नुकसानीचा आकडा जवळपास वीस कोटींच्या घरात असण्याची शक्यता वास्कोत माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

त्वरित पुनर्वसन करा व दुर्घटनेची सखोल चौकशी करा, नुकसानग्रस्तांची मागणी
मार्केटमधील नुकसानग्रस्त दुकान मालकांनी नुकसानीचा अधिकृत आकडा स्पष्ट करण्यासाठी असमर्थता दर्शवली. सर्व दुकान मालकांची बैठक व चर्चा, चौकशी झाल्यानंतरच, असे त्यांनी स्पष्ट केले आहे मात्र, सरकारने शक्य तेवढ्या लवकर, आहे त्याच जागी आमची पुन्हा व्यवस्था करावी तसेच घडलेल्या आग दुर्घटनेची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

दुर्घटना राज्य आपत्ती जाहीर करा : खासदार विरियातो फर्नांडिस
गुरुवारी सकाळी १० वा.च्या सुमारास दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली तसेच दुकानदारांशी चर्चा केली. त्यांनी माध्यमांशी बोलताना आगीची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून या घटनेची सखोल चौकशी व्हावी तसेच सरकारने ही घटना राज्य आपत्ती म्हणून जाहीर करावी, अशी मागणी केली.

तासाभरात आगीच्या तीन घटनांमुळे आश्चर्य
बुधवारी रात्री वास्कोत केवळ तासाभरात तीन आगीच्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत नवेवाडे भागात एका घराच्या खोलीत आग लागून नुकसान झाले. दुसऱ्या घटनेत शहरातील टिळक मैदान संकुलातील एका गाळ्याला आग लागून नुकसान झाले. तर संडे मार्केटमथील आग दुर्घटना ही तिसरी घटना ठरली. त्यामुळे अग्निशामक दलाची तारांबळ उडाली. संडे मार्केटची आग दुर्घटना वास्कोतील आतापर्यंतची सर्वाधिक भीषण घटना ठरली आहे. तासाभरात तीन घटना घडल्याने आश्चर्य पसरले आहे. संडे मार्केटच्या दुर्घटनेमागे घातपात नसावा ना असाही संशय पसरलेला आहे. त्यामुळे सखोल चौकशीची मागणी होत आहे.

कच्च्या स्वरुपाची सर्व दुकाने आगीत खाक
मुरगाव नगरपालिकेची मॉर्डन मार्केट इमारत ही पक्क्या स्वरुपाची आहे. तळ मजल्यावर व्यावसायिक गाळे आहेत. तर या इमारतीच्या गच्चीवर कच्च्या स्वरुपाची दुकाने होती. ती गच्चीवरील लोखंडी शेडखाली प्लास्टिक व लाकडी साहित्याने उभारलेली होती. त्या आगीत जळून खाक झाल्या. अशाच प्रकारची छोटी छोटी दुकाने या मार्केटमागील मोकळ्या जागेत उभारण्यात आली होती. जमिनीवर एकूण १२० तर गच्चीवर ७२ दुकाने होती, अशी माहिती मिळते. कच्च्या स्वरुपाची सर्वच दुकाने जळून खाक झाली. जमिनीवरील पत्र्यांची काही दुकाने अर्धवट जळाली तर काही दुकाने सुरक्षीत राहिली. आगीमध्ये भक्ष्यस्थानी पडलेल्या दुकानांमध्ये दिवाळीनिमित्त आणलेला लाखोंचा माल होता.

अग्निशामक दलाच्या २० बंबांनी पहाटे ३ वाजेपर्यंत मिळवले आगीवर नियंत्रण
गोवा अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ते स्वतः हजर होते. वास्कोतील अग्निशामक दलाबरोबरच वेर्णा, फोंडा, मडगाव, कुंकळ्ळी, कुडचडे, ओल्ड गोवा येथील अग्निशामक बंब तसेच एमपीए, गोवा शिपयार्ड, नौदल यांचे बंब मिळून एकूण २० अग्निशामक बंबांनी कष्ट घेतल्याची माहिती रायकर यांनी दिली.

नेते व वरिष्ठ अधिकारी पहाटेपर्यंत घटनास्थळी
पहाटेपर्यंत घटनास्थळी मंत्री माविन गुदिन्हो, आमदार दाजी साळकर, संकल्प आमोणकर, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, पोलिस महासंचालक अलोक नाथ, मुरगावचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक यांच्यासह गोव्याच्या बहुतेक भागातील रात्रीच्या गस्तीवरील पोलिस वास्कोत घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी रोखला जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न
मध्यरात्रीच्या दुर्घटनेवेळी काही नुकसानग्रस्त दुकानदारांनी टाहो फोडून रडायला सुरुवात केली. काहींनी सामान वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अनेकांना अशा प्रयत्नांपासून रोखले. दुर्घटना स्थळाभोवती पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५० मीटर अंतरापर्यंत कडे करुन मार्ग रोखले होते.

व्यापाऱ्यांना त्वरित नुकसान भरपाईची आमदार युरी आलेमाव यांची मागणी
वास्कोतील दुर्घटनेप्रकरणी आमदार युरी आलेमाव यांनी राज्य सरकारवर खापर फोडले आहे. हा सरकारचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला. हडफडेतील २५ जणांचा बळी घेणाऱ्या घटनेचेही आठवण करुन देत त्यांनी सरकार सुरक्षा उपाययोजना करण्यास पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप केला. जळालेल्या वास्कोतील मार्केटमध्ये कोणतीही सुरक्षा उपाययोजना नव्हती असे स्पष्ट करुन ईव्हेंट आयोजनावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, डॉ. अंजली निंबाळकर, गिरीश चोडणकर, अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे नेते व इतर नेत्यांनीही भेट देऊन नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी केली व या दुर्घटनेप्रकरणी सरकारवर टीकाही केली.

दरम्यान, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर व अन्य नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली.

Advertisement
Tags :

.