वास्कोत यंदा रस्त्यांवर दिवाळी बाजार नाही; हाऊस ऑफ साळगावकरसमोरील महसूल खात्याच्या जमिनीवर बाजार; व्यापाऱ्यांचीही संमती
बुधवारी मध्यरात्री वास्को शहरातील संडे मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत व्यापाऱ्यांचे तसेच पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. दिवाळीच्या सणाच्या तोंडावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळी बाजारासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
दरवर्षी वास्को शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर दिवाळी बाजार भरवण्यात येतो. मात्र, आग दुर्घटनाग्रस्त मार्केटच्या जवळच पुन्हा बाजार भरवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे यंदा रस्त्यांवर बाजार न भरवता खुल्या जागेत बाजार उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
व्यापाऱ्यांनी निर्णयाला दिला होकार
दिवाळी बाजाराच्या व्यवस्थेसंदर्भात सोमवारी आमदार दाजी साळकर, मामलेदार प्रविणजय पंडित, पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, वास्को अग्निशामक दलाचे प्रमुख दिलीप बिचोलकर तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी प्रशासनाने नव्या जागेवरील बाजाराची माहिती व्यापाऱ्यांना दिली. व्यापाऱ्यांनीही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत संमती दर्शवली.
महसूल खात्याच्या जमिनीवर तयारी सुरू
हाऊस ऑफ साळगावकर इमारतीसमोरील महसूल खात्याच्या जमिनीची दिवाळी बाजारासाठी निवड करण्यात आली आहे. नवीन मासळी मार्केटचे बांधकाम सुरू असताना याच ठिकाणी तात्पुरते मासळी मार्केट उभारण्यात आले होते. ती शेड अद्याप या जमिनीवर उपलब्ध आहे.
दिवाळी बाजार उभारण्यासाठी पालिकेने सोमवारपासूनच जागेची साफसफाई सुरू केली असून, व्यापाऱ्यांनीही आपापल्या दुकानांच्या व्यवस्थेसाठी तयारी सुरू केली आहे. यंदा प्रथमच वास्कोतील दिवाळी बाजार रस्त्यांऐवजी मोकळ्या जागेत भरवण्यात येणार आहे.
दरम्यान, दिवाळी बाजार रस्त्यांवर कुठेही भरवण्यात आल्यास संबंधितांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
