नेरूर-कलेश्वर मंदिर येथे आज वसंत पूजा
नॅशनल अवॉर्ड विजेते शास्त्रीय गायक श्री.महेश काळे यांचा 'स्वरसंध्या' हा विशेष कार्यक्रम
जिल्ह्यातील नामवंत व्यक्तींची राहणार उपस्थिती
त. भा. प्रतिनिधी / डिगस
कुडाळ तालुक्यातील श्री देव कलेश्वर मंदीर नेरुर येथील प्रथम मानकरी असलेल्या मतकरी कुटुंबियांची वसंत पूजा आज दि. ३ एप्रिल रोजी श्री देव कलेश्वर मंदीर नेरुर येथे मोठ्या भक्तीभावाने संपन्न होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वा. नेरुर-चव्हाटा येथून भव्यदिव्य मिरवणूकीने सुरुवात होणार आहे. के, धनाजीराव शिंदे तरुण मंडळ प्रेरित विठ्ठल-रखुमाई लेझिम पथक, केळेवाडी (भुदरगड-कोल्हापूर) यात सहभागी होणार आहेत. सदर मंदिरात वसंत पूजा कार्यक्रम सुरु राहणार आहे. ६.४५ वा. नौबद झाल्यावर नॅशनल अवॉर्ड विजेते शास्त्रीय गायक श्री. महेश काळे यांचा खास शैलीतील लोकप्रिय 'स्वर संध्या हा भक्तिरस आणि शास्त्रीय संगीताचा सुंदर मिलाफ असलेला कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मध्यांतरात विविध मान्यवरांचे भाषण व सत्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित्ती राहणार आहे.सदर मंदिरात हा कार्यक्रम अविरतपणे चालू राहणार असून यात वसंतऋतू मध्ये येणाऱ्या फळांचा नैवेद्य देवाला दाखवून कार्यक्रम संपन्न केला जातो, हे याचे महात्म्य विशेष आहे. तरी या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी व जिल्हावासीयांनी घ्यावा, असे आवाहन श्री. मुरलीधर ऊर्फ याबूकाका प्रभू-मतकरी व मतकरी कुटुंबीय शिरसोसवाडी-नेरुर यांच्यावतीने करण्यात आले आहे.