For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'वरुणतीर्थ' पावसाने भरणारच...

12:10 PM May 23, 2025 IST | Radhika Patil
 वरुणतीर्थ  पावसाने भरणारच
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशीद :

Advertisement

कोल्हापुरातील वरूणतीर्थ तळे म्हणजे पावसाच्या पाण्याने भरणारे तळे. त्या तळ्यात आणि त्यात भरून राहणाऱ्या पाण्याला तीर्थ म्हणून ही श्रद्धेची उपमा करवीर महात्म्यात दिली गेली आहे. तळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात वरूणतीर्थाला आणि त्यातील पाणीसाठ्याला दिला गेलेला हा मोठा मान आहे. या तळ्याची रचनाच अशी की वळवाचा एक जरी मोठा पाऊस झाला तरी तळे भरून जाणार, हे जणू ठरूनच गेलेले आहे. पण अलीकडे वरूणतीर्थ सुशोभीकरण अंतर्गत तळ्यात पावसाचे पाणीच राहू नये, ते बाराही महिने व्यवस्थित राहावे, असा एक प्रयत्न होत आहे. पावसाळ्यातही हा तलाव खेळाच्या वापरासाठी यावा, असा बदल केला जात आहे. कदाचित 12 महिने वरूणतीर्थ तळे वापरात राहावे, अशीही त्यामागील एक वेगळी भावना असू शकेल.

पण वास्तव हे आहे की एक मोठा वळवाचा पाऊस झाला तरी तलाव पाण्याने भरून जाणार, हे वरूणतीर्थ या नावावरूनच अगदी स्पष्ट आहे. त्यासाठी मोठा खर्च केला जात आहे. पण मोठा पाऊस पडला की तळे भरणारच असल्याने त्यावर केलेला खर्च नक्कीच पाण्यात जाणार आहे आणि पावसाळ्यात तळे भरणारच आहे. त्यामुळे सुशोभीकरण करताना साऱ्या इतिहासाचा संदर्भ घेणे आवश्यक आहे.

Advertisement

कोल्हापूरच्या इतिहासात कोल्हापूर म्हणजे छोट्या-मोठ्या तळ्यांचे एक गाव होते, अशी नोंद आहे आणि ही तळी नक्कीच कोल्हापूरच्या पर्यावरणासाठी आवश्यक होती. त्यापैकी रावणेश्वर तळे मुजवून तेथे शाहू स्टेडियम उभे राहिले. कपिलतीर्थ मुजवून तेथे मंडई भरू लागली. पद्माळा तलाव मुजवून तेथे आता क्रीडा संकुल उभे राहत आहे. खाराळे तळे मुजवून तेथे लक्ष्मीपुरी वसवली गेली. कुंभार तळे मुजवून शाहू उद्यान उभे राहिले. फिरंगाई तळे मुजवून पेटाळा मैदान तयार केले गेले. सिद्धाळा मुजवून तेथे उद्यान तयार करण्यात आले. टाकाळा तळे मुजवून कचरा खण तयार केली गेली. साहेबांचे तळे मुजवून वॉटर पार्क तयार केला गेला. खंबाळा तळे मुजवून लक्ष्मी सरस्वती टॉकीज उभी राहिली. टाऊन हॉल उद्यानात असलेले कुकुटेश्वर तळे कचरा टाकून मुजवले गेले. टाकाळा तळे बुजवून कचरा खण तयार केली गेली. आता कोटीतीर्थ, रंकाळा आणि लक्षतीर्थ ही तीन तळी या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेत आपले अस्तित्व टिकवून आहेत.

वरूणतीर्थ तळे 1943 ला मुजवण्यात आले. त्यावेळचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी जे. पी. नाईक यांच्या पुढाकाराने वरूणतीर्थ तळे मुजवण्याची कार्यवाही झाली 4 सप्टेंबर 1943 ला वरूणतीर्थ तळे मुजवायला प्रारंभ झाला. त्या वेळचे नगरसेवक दुधगावकर वैद्य यांच्या हस्ते वरूणतीर्थाचे पूजन झाले, त्यानंतर बलभीम बँकेच्या बाजूने वरूणतीर्थातले पाणी बाहेर काढण्यासाठी एक भिंत फोडली. तेथून वरूण तीर्थातले पाणी हळूहळू बाहेर पडू लागले. पण काही वेळानंतर पाण्याचा जोर इतका वाढला, की बलभीम बँकेसमोरची काही घरे वाहून जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. अग्निशामक दल, पोलीस यंत्रणेला पाचारण करण्यात आले. स्वत: जे. पी. नाईक येथे रात्रभर बसून राहिले. वरूणतीर्थातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे एक घर पडले. त्या कुटुंबाला नगरपालिकेच्या वतीने मदत करण्यात आली. तळ्यातील पाणी बाहेर पडल्याने 10 एकर मोकळी जागा नगरपालिकेला मिळाली.

पुढे या मैदानात मध्यभागी महात्मा गांधींचा पुतळा उभा करण्यात आला. काही वर्षांनी तो पुतळा मैदानाच्या कडेला पुनर्स्थापित करण्यात आला आणि वरूणतीर्थाचे रूपांतर खऱ्या अर्थाने गांधी मैदानात झाले. अर्थात बारा महिने पाण्याने भरलेला तलाव या योजनेमुळे मोकळा झाला. पण पावसाळ्यात पुन्हा पुन्हा भरू लागला. पाऊस नसल्याच्या आठ महिन्याच्या काळात त्याचा चांगला उपयोग होऊ लागला. मोठ्या राजकीय सभा तेथेच होऊ लागल्या. फुटबॉल रोज रंगू लागला. मैदानात ओपन जिम उभी राहिली. अलीकडच्या काळात काही काळ रात्री वरूणतीर्थ म्हणजे रस्सा मंडळासाठी ऐसपैस मैदान म्हणून ही चुकीचा वापर झाला. आता हे वरूण तीर्थ मैदान आठ महिने कोरडे असते आणि पावसाळ्याच्या चार महिन्यात तेथे पुन्हा तळेच तयार होते. आता हे तळे बारा महिने वापरात असावे, त्यासाठी त्यात मिसळणारे पाणी रोखण्याचे काम सुरू आहे.

लोकांच्या मते हा तलाव काहीही केले तरी त्यात पावसाचे पाणी भरत राहणार हे नक्की आहे. त्यामुळे फार मोठा खर्च त्यावर न करता पावसाळ्यात त्यात पाणी भरले तर ती आपत्ती न मानता वरुणतीर्थ तळे पावसाळ्यात भरणारच हे सर्वांनी मान्य करण्याची गरज आहे आणि इतर आठ महिने वरूणतीर्थ मैदान व्यायाम, फुटबॉल, मोठ्या सभा, ओपन जिम, मोठे कार्यक्रम तेथे व्हावेत, अशी नागरिकांची भावना आहे. अगदी आजचे चित्र पाहिले तर दोन दिवसांपूर्वी पडलेल्या वळवाच्या पावसाने वरूणतीर्थ तळे भरून गेले आहे. जे वरूणतीर्थ पावसाने भरणारच, अशी त्याची रचना असताना ते वारंवार पावसात भरत राहणार, हे वास्तव आहे. पण वरूणतीर्थ मैदान पावसाने भरले म्हणजे आपत्ती मानू नये किंवा फार मोठे आश्चर्य मानू नये, अशी ज्येष्ठ नागरिकांची भावना आहे. शिवाजी पेठेतल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना वरूणतीर्थ मैदानाचा अभिमान आहे. पण त्याचे योग्य नियोजन व्हावे ते वेळेत पूर्ण व्हावे, ही नागरिकांची भावना आहे.

  • सांडपाणी रोखणार

वरूणतीर्थ मैदानात पावसाचे पाणी तर साठतेच, पण सांडपाणीही मिसळते. त्यामुळे दलदल वाढते. तलावाभोवती मोठी चर मारून पाणी रोखण्याचे नियोजन आहे. पाच कोटी रुपये त्यासाठी अंदाजित खर्च आहे. येत्या चार-पाच महिन्यात हे काम पूर्ण होईल. पावसाळ्यात फक्त त्यात पावसाचे पाणी साठेल. ते देखील हळूहळू बाहेर पडेल. मात्र त्यात सांडपाणी मिसळणार नाही, यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. त्यामुळे वरूणतीर्थाचे स्वरूप आणखी चांगले होईल.

                                                                                                  - व्ही. के. फुलारी अभियंता, महापालिका

  • ऐतिहासिक वारसा

गांधी मैदान ऐतिहासिक मैदान आहे. पावसाचे पाणी त्यात साठू दे त्याचा निचरा हळूहळू आपोआप होईल. या मैदानात व्ही. पी. सिंग, इंदिरा गांधी आणीबाणीच्या काळात पु. . देशपांडे, दुर्गा भागवत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभा झाल्या आहेत. अनेक खेळाडू या मैदानातूनच तयार झाले आहेत. किंबहुना वरूणतीर्थ मैदान हा आमचा अभिमान आणि शान आहे. त्याचे काम आता सुरू आहे. पण ते योग्य पद्धतीने होत आहे, असे वाटत नाही.

                                                                                                      - रविकिरण इंगवले, माजी उपमहापौर

  • मैदानात फुटबॉल बहरला

आम्ही पावसाळ्यातही या मैदानावर फुटबॉलचा सराव केला आहे. मैदानावर पावसाळ्यात सराव करणे म्हणजे अवर्णनीय असा आनंद होता. त्यामुळे आम्ही खेळाडू पावसाची वाट पाहत असायचो. चिंब भिजून या तळ्यात फुटबॉल खेळणे हा अनुभव वेगळाच होता. पण या पाण्यात काही वर्षापासून सांडपाणी मिसळत आहे ते तातडीने रोखण्याची गरज आहे.

                                                                         - अमर सासणे, सचिव, सरदार तालीम मंडळ शिवाजी पेठ

Advertisement
Tags :

.