For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वरुणराजाने ‘कांगारुंना’ तारले

06:58 AM Mar 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
वरुणराजाने ‘कांगारुंना’ तारले
Advertisement

पावसामुळे सामना रद्द : ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये तर अफगाणिस्तानचे गणित जर-तर वर

Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलच्या दृष्टीने अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना खूप महत्त्वाचा होता. या सामन्याचा विजेता संघ ब गटातून चॅम्पियन्स ट्रॉफी उपांत्य फेरीत जाणारा पहिला संघ ठरणार होता. पण अफगाणिस्तानची फलंदाजी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात 12 षटके होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर बराच वेळ थांबून मैदान सामन्यासाठी पुन्हा तयार होते की नाही, याचे पंचांनी निरिक्षण केले. पण लाहोरच्या या मैदानावर प्रचंड पाणी असल्याने सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला.

Advertisement

दरम्यान, ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, 2009 च्या हंगामात चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावल्यानंतर कांगारुंनी प्रथमच सेमीफायनल गाठली आहे. याचवेळी, अफगाण संघाच्या आशा शनिवारी कराची येथे होणाऱ्या इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सामन्यावर टिकून आहेत. ऑस्ट्रेलिया सर्वाधिक 4 गुणांसह पात्र ठरली, तर अफगाण संघ 3 गुण तर आफ्रिकेचा संघही 3 गुणांसह शर्यतीत आहे. त्यामुळे आता अफगाण संघाला आता इंग्लंडने विजय मिळवावा अशी अपेक्षा असेल, जेणेकरून दक्षिण आफ्रिकेचा रन रेट कमी होईल आणि टेम्बा बावुमाचा संघ तिस्रया स्थानावर घसरेल. अर्थात, या सामन्यात इंग्लंडला आफ्रिकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.

तत्पूर्वी, पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 274 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 12.5 षटकात 1 बाद 109 धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड जबरदस्त फॉर्मात होता. त्याने 40 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 59 धावा केल्या होत्या.

प्रारंभी, अफगाणिस्तान टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. सलामीवीर रहमानुल्लाह गुरुबाज याचा अपवाद वगळता टॉप 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. स्पेन्सर जॉन्सनने पहिल्याच षटकात रहमानुल्लाह गुरबाजला शून्यावर बाद केले. यानंतर, इब्राहिम झद्रन आणि सोदीकुल्लाह अटल यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि तिसऱ्या विकेटसाठी 67 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. इब्राहिम झद्रनला (22) अॅडम झम्पाने पायचीत केले. सेदीकुल्लाह अटल याने 95 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. अटलच्या 85 धावांच्या खेळीनंतर, अझमतुल्लाह उमरझाईने शेवटच्या षटकांमध्ये जलद गतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 63 चेंडूत 67 धावा केल्या. विशेष म्हणजे, उमरझाईने शेवटच्या काही षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे अफगाण संघाला 273 धावापर्यंत मजल मारता आली.

Advertisement
Tags :

.